म. टा. प्रतिनिधी, पुणे : चार वर्षांपासून रखडलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे जिल्हा परिषदेत ‘क’ गटातील २१ पदांच्या सुमारे एक हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये एकाच वेळी मेगाभरती करण्यात येणार असल्याने तरुणांना रोजगाराची संधी खुली झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी याबाबतची माहिती दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया २०१९मध्ये सुरू करण्यात आली होती. मात्र, ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे भरती प्रक्रिया कधी सुरू होणार याची प्रतीक्षा होती. आता ही प्रक्रिया सुरू झाल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारची मान्यता मिळाल्याने जिल्हा परिषदांमध्ये २० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार ३८ जागा, तर पुणे जिल्हा परिषदेत एक हजार जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.

Success Story : आधी PCS नंतर IAS अधिकारी बनून करतेय काम; देशसेवेसाठी या अभिनेत्रीने सोडले मनोरंजनविश्व

गावडे म्हणाले, ‘आयबीपीएस या खासगी यंत्रणेद्वारे ही सर्व प्रक्रिया होत आहे. अर्ज ऑनलाइन करता येणार असून, ही प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली आहे. येत्या २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर अर्ज करण्यासाठी जावे लागणार आहे. त्यासाठी सरळ सेवा भरतीची सर्व माहिती देण्यात आली आहे. अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा होणार आहे. त्यानंतर मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.’

अनेक जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रिया होत असल्याने उमेदवारांनी एकाच पदासाठी विविध जिल्ह्यांत अर्ज करू नयेत. अन्यथा अर्ज बाद ठरविले जातील. विविध पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार, तर मागासवर्गीय गटासाठी ९०० रुपये अर्ज शुल्क आहे. अर्ज आणि पदाच्या सर्व माहितीसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर लिंक देण्यात आली आहे.

साठ हजार उमेदवारांना दिलासा

‘जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी यापूर्वी २०१९मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी ६० हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. त्या वेळी परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे अर्जासोबत भरलेली शुल्काची रक्‍कम उमेदवारांना परत केली जाणार आहे. या सर्व उमेदवारांना वयामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या उमेदवारांना आताच्या परीक्षेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्‍यक आहे,’ अशी माहिती राहुल गावडे यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *