गोपीनाथरावांचा वारसा सांगणाऱ्यांची कार्यपद्धती अशोभनीय:बीड प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते आक्रमक, मुंडे बंधू-भगिनींच्या राजीनाम्याची केली मागणी
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष यांच्या हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. त्यांच्याकडून अनेक दावे, आरोप करताना पाहायला मिळत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनीही धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गोपीनाथरावांचा वारसा सांगणाऱ्यांची कार्यपद्धती शोभणारी नाही. तसेच बीडच्या भागातील जनतेचा विश्वास या दोन्ही बहीण-भावावरून उडालेला आहे. अशी टीका कीर्तिकर यांनी केली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींपैकी फरार असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे 25 दिवसांनी पुण्यातून अटक करण्यात आली. सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासाद्वारे दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. मात्र अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून गजानन कीर्तिकर यांनी एका ‘वृत्तवाहिनी’शी बोलताना उपरोक्त मागणी केली आहे. बीड प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस आणि शिंदे गटाचे माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुंडे बहीण-भावावर केलेल्या टीकेवरून महायुतीत असलेला बेबनाव पुन्हा एकदा समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. काय म्हणाले गजानन कीर्तिकर?
गेल्या 15 वर्षांपासून शिवसेना संघटना बांधण्याचे काम मराठवाड्यात करत होतो. सर्व जिल्ह्यातील जवळपास साडे सहाशे गावांत माझा संचार झाला. तिथे असलेले जनजीवन जवळून पाहिले. तेथील परिस्थिती जवळून पाहिली. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सरपंच संतोष देशमुख याची हत्या ही भयभीत करणारी परिस्थिती आहे, असे गजानन कीर्तिकर म्हणाले. धनंजय मुंडेंना हा गुंड पोसण्याची गरज काय?
1995 मध्ये भाजपा नेते दिवगंत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गृहराज्यमंत्री म्हणून काम केले. त्यांची काम करण्याची पद्धत आणि वैचारिक बैठक मजबूत होती. ते गृहमंत्री होते, मनात आणले असते, तर दहा वाल्मीक कराड उभे करू शकले असते. मात्र, तशी त्यांची विचारधारा नव्हती. परंतु, आता मोठा वैचारिक बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वाल्मीक कराड हा गुंड धनंजय मुंडे यांना पोसण्याची गरज काय? असा सवाल गजानन कीर्तिकर यांनी केला. असे वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे. गुंड पोसून राजकारणात मोठे होता येते, पण ते फार काळ टिकत नाही, अशी टीकाही गजानन कीर्तिकर यांनी केली. जनतेचा विश्वास बहीण-भावावरून उडाला
गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सांगणाऱ्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची कार्यपद्धती शोभणारी नाही, असे कीर्तिकर म्हणाले. त्या भागातील जनतेचा विश्वास या दोन्ही बहीण-भावावरून उडालेला आहे. त्यांच्याबद्दल रोष निर्माण झाल्याचेही ते म्हणाले. नैतिकता म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा. तरच त्यांना यापुढे राजकीय वाटचाल करताना अडचण येणार नाही, असा सल्ला गजानन कीर्तिकर यांनी दिला. त्या भागात जनता एकसंघ होती, दादागिरीचा लवलेश नव्हता, तो मराठवाडा गेला कुठे? अशी विचारणा गजानन कीर्तिकर यांनी केली. गोपीनाथ मुंडेंच्या विचाराला या गोष्टी मारक
बीडमधील जनतेचा विश्वास उडाला आहे. बीडच्या जनतेचा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंडे बंधू-भगिनींनी त्यागपत्र द्यावे, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे गजानन कीर्तिकर म्हणाले. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना हे शोभदायक नाही. गोपीनाथ मुंडे यांनी पेरलेला विचाराला या गोष्टी मारक आहे. या राज्यात नेमके चाललेय काय, दयनीय परिस्थिती महाराष्ट्रात सुरू आहे, असा हल्लाबोल गजानन कीर्तिकर यांनी केला.