म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः गुजरातच्या एका व्यापाऱ्याचे तीन कोटींचे हिरे आणि त्याच्याकडून ८० लाख रुपये लंपास करण्याचा चौघांचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. हिरे दुबईला पोहोचवतो असे सांगून या व्यापाऱ्याच्या परिचयातील महिलेने आणखी तिघांच्या मदतीने फसविण्याचा प्रयत्न केला. विमानतळावर कस्टम विभागाने पकडल्याचा बहाणा करून व्यापाऱ्याकडे पैशाचीही मागणी करण्यात आली. व्यापाऱ्याने वेळेत पोलिसांची मदत घेतल्याने फसवणूक टळली.

गुजरातच्या सुरतचे व्यापारी जयरामभाई अंकोलिया यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून दुबईमध्येही कार्यालय आहे. नियमितपणे या ठिकाणी हिऱ्यांची ने-आण केली जाते. त्यांच्या या व्यवसायाची माहिती असलेल्या परिचयातील महिलेने तिच्या ओळखीचा एक तरुण दुबईला जात असून हिरे न्यायचे असल्यास सांगा, असे व्यापाऱ्यास सांगितले. दुबईची फेरी वाचणार असल्याने व्यापाऱ्याने या महिलेवर विश्वास ठेवून तीन कोटींचे हिरे तिच्याकडे दिले. या तरुणाला मुंबई विमानतळावर नेऊनही सोडले. काही वेळाने व्यापाऱ्याला फोन आला आणि समोरील व्यक्तीने कस्टम विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तीन कोटींचे हिरे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तुमच्या माणसाला आम्ही ताब्यात घेतले असून हिरे आणि त्याला सोडविण्यासाठी ८० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. व्यापाऱ्याने तयारी दर्शवताच त्याला विमानतळाऐवजी अंधेरी येथे बोलावले. याठिकाणी पोहोचल्यावर व्यापाऱ्याने फोन करताच त्याला काशिमिरा परिसरात बोलावले. कमी वेळेत पोहोचणे शक्य नसल्याने व्यापाऱ्याने मित्राला पाठविले. हे करत असताना कस्टम विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी बोलावत असल्याने व्यापाऱ्याला संशय आला आणि त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पैसे न पाठविल्यास मित्राला ठार मारू अशी धमकी आल्यानंतर आपला संशय खरा असल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आले. व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रकरण गंभीर असल्याचे पाहून उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक विलास भोसले, दिलीप तोजनकर, विजय रासकर, अल्ताफ खान, अमोल राणे, प्रसाद गोरूले, गोमे, जाधव, शिरसाट यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने काशिमिरा येथील लक्ष्मी पॅलेस या हॉटेलवर छापा टाकला. या ठिकाणी असलेल्या तिघांच्या मुसक्या आवळत व्यापाऱ्याच्या मित्राची सुटका केली. हिरेदेखील जप्त करण्यात आले असून त्या महिलेचा पोलिस शोध घेत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.