म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः शहरात आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून मोठ्या प्रमाणात बनावट खवा येत असून तो ‘स्पेशल बर्फी’ म्हणून मिठाई विक्रेत्यांना सहज उपलब्ध होत आहे. हा खवा शहरात तयार होणाऱ्या खव्याच्या किमतीपेक्षा निम्म्या किमतीत मिळत असल्याने मिठाई विक्रेत्यांनी हाच खवा मिठाई विक्रीसाठी सर्रास वापरणे सुरू केले आहे.

मिठाई बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खव्याचा वापर केला जातो. मात्र, या खव्याची उपलब्धता उत्पादनाच्या तुलनेत कमी असते. त्याला पर्याय म्हणून मिठाई विक्रेत्यांनी नामी क्लृप्ती शोधन काढली आहे. गुजरातमधील अहमदाबाद परिसरात तयार होणाऱ्या खव्याचा वापर सुरू केला आहे. त्यास मिठाई दुकानदारांच्या सांकेतिक भाषेत ‘स्पेशल बर्फी’ म्हणून संबोधले जाते.

नाशिकसह राज्यात जाळे

गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या या ‘स्पेशल बर्फी’वर बंदी आहे. काही उत्पादकांनी महाराष्ट्रालगत याचे कारखाने सुरू केले आहेत. राज्यात सहज पोचणाऱ्या या खवा वितरणाचे नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जाळे सक्रीय झाले आहे. ही स्पेशल बर्फी खासगी ट्रॅव्हलद्वारे बसेसमधून आणली जाते. सकाळी दाखल होणाऱ्या या गाड्या शहराच्या विविध भागात येतात. तेथून मिठाई विक्रेते आपापल्या गाड्यांमधून खवा घेऊन येतात. रोज सुमारे पाचशे रुपये किलो दराने ‘स्पेशल बर्फी’ नाशिकमध्ये उपलब्ध होत आहे.

जादा नफ्याचा हव्यास

मिठाईच्या कारखान्यात खवा तयार करायचा झाल्यास त्याला वेळ, इंधन तसेच मुबलक प्रमाणाचा दुधाचा साठा लागतो. मात्र, गुजरातमधून येणाऱ्या खव्यासाठी यातील काहीही गोष्टींची गरज लागत नाही. उलट तो नाशिकमध्ये उत्पादित होणाऱ्या खव्याच्या दरापेक्षा निम्म्या दराने मिळतो. त्यामुळे नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.

‘एफडीए’चे कानावर हात

गुजरातमधून येणारी ‘स्पेशल बर्फी’ पॅकिंगमध्ये उपलब्ध होते. या बर्फीच्या उत्पादकांकडे थेट केंद्र सरकारचा परवाना असतो. त्यामुळे त्याच्या दर्जाची गुणवत्ता महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये राज्यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) तपासली जात नाही. त्यामुळेच या ‘स्पेशल बर्फी’ची बिनबोभाट विक्री केली जात आहे.

काय आहे ‘स्पेशल बर्फी’?

– ‘स्पेशल बर्फी’ म्हणून ओळखला जाणारा खवा दूध वापडर व व्हेजिटेबल ऑइल यांच्या मिश्रणातून तयार केला जातो.

– शहरातील मिठाई विक्रेत्यांना हा खवा मिळाल्यानंतर त्यात इसेन्स टाकून आकार देत मिठाई बनविली जाते.

– सध्या दूध ७० ते ८० रुपये प्रतिलिटर आहे. एक किलो खवा बनविण्यासाठी सुमारे सात लीटर दूध लागते.

– अस्सल शुद्ध खव्याचा भाव चारशे ते सहाशे रुपये किलोदरम्यान असतो.

– मात्र, गुजरातमधून येणारा खवा अवघा शंभर ते दोनशे रुपये किलो दराने उपलब्ध होतो.

– ‘स्पेशल बर्फी’ खरेदीला अनेक मिठाई विक्रेत्यांकडून प्राधान्य दिल्याचे चित्र दिसत आहे.

बनावट खव्याचे दुष्परिणाम काय?

– बनावट खव्यापासून बनविलेली मिठाई खाल्ल्याने पोटाचे विकार होतात.

– अपचन, जुलाब, वांत्या डोकेदुखी असा आजारही होऊ शकतो.

– बनावट खव्याच्या निर्मितीमध्ये रसायनांचाही वापर केला जातो.

– जादा रसायनयुक्त खव्याचे सेवन तब्बेतीस हानिकारक आहे.

– नागरिकांनी मान्यताप्राप्त दुकानातूनच मिठाईची खरेदी करावी.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.