हरियाणा विधानसभा 2024:भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना; पण गणित बिघडणार
हरियाणात केंद्र व राज्य सरकारची कामे आम्ही सातत्याने पाहत आहोत. आमचेही काही मुद्दे आहेत. उमेदवार व पक्षांना पाहत आहोत. पक्षाचे नाव न घेता सिरसा मंडीत अनेक सहकाऱ्यांसह बसलेले आढती कश्मीर कंबोज म्हणाले, आधी तर निवडणूक एकतर्फी वाटत होती. परंतु आता कडवा संघर्ष दिसतो. निवडणूक जवळ येत असतानाच हरियाणात कडवी झुंज पाहायला मिळत आहे. मुख्य अटीतटीचा मुकाबला भाजप व काँग्रेसमध्ये आहे. निवडक जागा सोडल्यास राज्यातील ९० मतदारासंघांपैकी बहुतांश ठिकाणी संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामागे दोन कारणे आहेत. दोन प्रमुख पक्षांव्यतिरिक्त अपक्ष, इनेलो, जजपा व आपही जोर लावताना दिसेल. ३० पेक्षा जास्त ठिकाणी तिरंगी लढती होतील. त्यामुळे हे सामने अटीतटीचे होतील. १५ जागी भाजपचे १९ व २० जागांवर काँग्रेसचे २९ बंडखोरही मैदानात आहेत. या पक्षांचे अधिकृत उमेदवारही प्रभावी दिसून येतात. परंतु त्यांच्यापेक्षा अपक्ष व बंडखोरांची चर्चा आहे. इनेलो, जजपा व अपक्षांंमध्ये यांच्या विभागलेल्या देवीलाल परिवारातील ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. सतत जाहीर सभा, रोड शो होत आहेत. काँग्रेस-भाजप अनुक्रमे गॅरंटी व संकल्पपत्रासह जनतेमध्ये पोहोचले आहेत. आतापर्यंत तरी प्रचारात भाजपची आघाडी दिसली. त्याची धुरा काळजीवाहू मुख्यमंत्री नायबसिंह सैनी व केंद्रीय मंत्री मनोहरलाल यांच्या हाती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभाही झाल्या. लवकरच मोदी, शाह पुन्हा दौऱ्यावर येतील. काँग्रेसची प्रचारसूत्रे हुडा पिता-पुत्रांपुरती मर्यादित आहेत. आतापर्यंत राहुल गांधी, प्रियंका वढेरा किंवा अध्यक्ष खरगे यांच्या सभा झालेल्या नाहीत. भूपेंद्र हुडा, दीपेंद्र हुडा मात्र सातत्याने सभा-रोड शो करत आहेत. कुमारी सेलजा अजूनही नाराज आहेत. रणदीप सुरजेवाला आपल्या मुलासाठी प्रचारात उतरलेले दिसतात. माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह आपल्या मुलासाठी परिश्रम घेत आहेत. मतदानाला १० दिवस बाकी आहेत. प्रचार व मुद्दे आता आणखी आक्रमक होतील.