वृत्तसंस्था, नवी दिल्ली

हीरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवनकांत मुंजाल यांनी परदेशात वैयक्तिक खर्चासाठी इतरांच्या नावे परकीय चलन जारी करून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी केला. तसेच मुंजाल यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून त्यांची २४.९५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

‘मुंजाल यांच्या दिल्लीतील तीन स्थावर मालमत्ता मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत,’ असे ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मुंजाल (६९) हे हीरो मोटोकॉर्प लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे २४.९५ कोटी रुपये आहे.

‘पवनकांत मुंजाल यांनी इतर व्यक्तींच्या नावाने विदेशी चलन जारी केले आणि ते परदेशात वैयक्तिक खर्चासाठी वापरले,’ असे ईडीने म्हटले आहे. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अधिकृत डीलर्सकडून आपल्या विविध कर्मचाऱ्यांच्या नावाने परकीय चलन काढून घेतले आणि ते मुंजाल यांच्या रिलेशनशिप मॅनेजरला दिले, असा दावा तपास संस्थेने केला आहे. ‘मुंजाल यांच्या वैयक्तिक/व्यावसायिक सहलींदरम्यान, त्याचा रिलेशनशिप मॅनेजर त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी हे परकीय चलन रोख/कार्डमध्ये गुप्तपणे घेऊन जात असे,’ असेही ईडीने म्हटले आहे.

लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (एलआरएस) अंतर्गत असलेली २.५ लाख डॉलर प्रतिव्यक्तीची वार्षिक मर्यादा टाळण्यासाठी ही पद्धत अवलंबण्यात आली, असा आरोप तपास संस्थेने केला आहे.

आरबीआयच्या मते, एलआरएस अंतर्गत अल्पवयीनांसह सर्व रहिवासी व्यक्तींना कोणत्याही अनुज्ञेय चालू किंवा भांडवली खात्यातील व्यवहारांसाठी किंवा दोन्हीच्या संयोजनासाठी प्रतिआर्थिक वर्ष (एप्रिल-मार्च) २.५ लाख डॉलरपर्यंतची रक्कम मुक्तपणे पाठविण्याची परवानगी आहे.

मुंजाल आणि त्यांच्या कंपन्यांविरुद्ध पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर ईडीने ऑगस्टमध्ये छापेमारी केली होती. कंपनी कायदा १९६२ अंतर्गत दाखल केलेल्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेकायदेशीरपणे परदेशी चलन भारताबाहेर नेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

‘फिर्यादी पक्षाकडून दाखल केलेल्या तक्रारीत ५४ कोटी रुपयांचे विदेशी चलन बेकायदेशीरपणे भारतातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप आहे,’ असे ईडीने म्हटले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *