नवी दिल्ली : न्यूझीलंडने मोठा विजय साकारला आणि त्यांनी सेमी फायनलचा दरवाजा ठोठावला आहे. न्यूझीलंडच्या विजयानंतर पाकिस्तानसाठीचे समीकरण लगेच समोर आले होते. पण अफगाणिस्तानच्या समीकरणाची मात्र जास्त चर्चा नव्हती. पण आता अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो, याचे समीकरण आता समोर आले आहे.अफगाणिस्तानचे आतापर्यंत आठ सामने झाले आहेत. या आठ सामन्यांमध्ये त्यांनी चार विजय मिळवले आहेत, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे चार विजयांसह त्यांचे आता आठ गुण झाले आहेत. आता त्यांचा नववा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर अहमदाबादला होणार आहे. जर या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने विजय साकारला तर त्यांना दोन गुण मिळतील. या दोन गुणांसह त्यांचे १० पॉइंट्स होतील. सध्या न्यूझीलंडचेही १० गुण आहेत. पण या दोन्ही संघात मोठी तफावत आहे ती रन रेटमध्ये. न्यूझीलंडच्या संघाने सामना जिंकला आणि १० गुणांसह त्यांचा रन रेट हा ०.७४३ असा आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानचा रन रेट हा सध्याच्या घडीला -.०३३८ एवढा आहे. त्यामुळे अफगाणिस्तानने किती धावांनी सामना जिंकला तर त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येऊ शकते, हे आता समोर आले आहे. अफगाणिस्तानच्या संघाने जर दक्षिण आफ्रिकेचा सामना ४३८ धावांनी जिंकला तर त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येऊ शकते. पण जर अफगाणिस्तानची प्रथम गोलंदाजी आली तर त्यांचे आव्हान तेव्हाच संपुष्टात येईल. त्यामुळे या सामन्यात टॉस तर महत्वाचा असेल. पण जर वास्तविक विचार केला तर त्यांना ४३८ धावांनी विजय मिळवता येऊ शकतो का, याचे उत्तर नाही असेच आहे. त्यामुळे अधिकृतपणे नाही पण अफगाणिस्तानचे या वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे हे मात्र निश्चित.अफगाणिस्तानच्या संघाने या वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केली. कारण त्यांनी पाकिस्तानसारख्या संघालाही धक्का दिला. त्यामुळेच ते सेमी फायनलच्या शर्यतीत होते. पण आता त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.