मुंबईतील ब्रिटिशकालीन पुलांचे आयुर्मान पूर्ण झाले आहे. शहरातील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्व पुलांची टप्प्याटप्याने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे रुळांवरील वाहने आणि पादचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी सन १८९३मध्ये बेलासिस रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आला होता. पश्चिम रेल्वेने शहरातील पुलांची संरचनात्मक तपासणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरवण्यात आला होता. त्यामुळे पुलाची पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली होती.
बेलासिस पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पुलावरील वाहतूक बंद करावी लागणार आहे. यासाठी साधारणत: १ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ‘पूल बंद झाल्यावर स्थानिक पादचारी आणि रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई सेंट्रल स्थानकातील मुख्य तिकीट खिडकीला जोडणारा तात्पुरता पूल उभारण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा मुंबईतील पहिलाच प्रयोग असणार आहे’, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी सांगितले. प्रवाशांसाठीच्या पुलाच्या उभारणीचे काम १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. चार महिन्यांमध्ये म्हणजेच १६ फेब्रुवारी, २०२४पर्यंत पूल वापरासाठी खुला करण्याचे नियोजन आहे. पादचारी पुलाचा आराखडा रेल्वे मुख्यालयाने मंजूर केला आहे.
ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपुलाच्या जागी केबलआधारित पूल उभारण्यासाठी मुंबई महापालिका, एमएमआरडीए यांनी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (महारेल) यांच्याशी करार केला आहे. त्यानुसार सध्या टिळक रेल्वे उड्डाणपूल, भायखळा रेल्वे उड्डाणपूल, रे रोड रेल्वे उड्डाणपूल यांची कामे सुरू आहेत. शहरातील अन्य पुलांची टप्प्याटप्प्याने पुनर्बांधणी करण्याचे महारेलचे नियोजन आहे.