नागपूर : साधारणत: पाच महिन्यांपूर्वी ते भेटले. पहिल्या नजरेत दोघांना ‘इश्क’ झाला. ‘रहना है तेरे दिले मे’प्रमाणे ते राहायला लागले. अल्पवयीन मुलगी व युवकाची लव्हस्टोरी वाऱ्यासारखी जरीपटका परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचली. नातेवाइकांच्याही कानावरही ही वार्ता गेली. मुलीने तर कमालच केली. ‘आई ‘ब्लॅक मॅजिक’ करते’, असा आरोप करत ती प्रियकरासोबत रफूचक्कर झाली.

जरीपटका पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारी १६वर्षीय करिना (बदललेले नाव) सदरमधील महाविद्यालयात अकरावीत शिकते. तिची आई कविताचे (बदललेले नाव) चहा-नाश्त्याचे दुकान आहे. पाच महिन्यांपूर्वी करिनाचे शांतीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या २२वर्षीय शुभांकर (बदललेले नाव) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. तो खासगी काम करतो. मुलीच्या प्रेमसंबंधाबाबत कविताला माहिती मिळाली. तिने करिनाची समजूत घातली. ‘अशा संबंधांचे दुष्परिणाम तुला कळणार नाहीत. तू त्याचा नाद सोड’, असे कविता करिनाला म्हणाली. मात्र, करिना ऐकायला तयार नव्हती. तिने हट्टच केला. दरम्यान, शुभांकर आजारी पडला. आईने काळी जादू केल्यानेच तो आजारी पडल्याचा करिनाचा समज झाला. दोन दिवसांपूर्वी तिची आई दुकानात होती. करिनाने आईच्या मोबाइलवर संपर्क साधला व घरी बोलाविले. ‘तू माझ्यावर आणि शुभांकरवर काळी जादू केली आहे. तुझ्यामुळे शुभांकरचे बरेवाइट होईल’, अशा शब्दांत करिना आई कविताशी वाद घालू लागली. कविता चाटच पडल्या. ‘मी दुकान बंद करून परत घरी येते’, असे म्हणत कविता दुकानात गेल्या. त्यांनी आपल्या भावाला याबाबत माहिती दिली. ‘तू करिनाला जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये घेऊन ये, मीही तेथे पोहोचते’, असे कविताने भावाला सांगितले.

करिनाचा मामा घरी गेला. त्याला करिना घरी दिसली नाही. त्याने कविताला याबाबत माहिती दिली. कविता घरी आली. ‘देवा, माझ्या मुलीला सुखरूप ठेव, तिला घरी परतण्याची सद्बुद्धी दे’, अशी प्रार्थना देवाजवळ करीत असतानाच कविता यांना चिठ्ठी दिसली. ‘मी माझ्या मर्जीने घर सोडून जात आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, मला शोधण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेल’, असे चिठ्ठीत करिनाने लिहिले आहे. कविता यांना धक्का बसला. त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने परिसरात शोध घेतला. मात्र, करिना आढळून आली नाही. त्यानंतर भावासह लगेच जरीपटका पोलिस स्टेशन गाठून कविता यांनी तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शुभांकर आणि करिनाचा शोध सुरू केला.

पोलिसही चाट

अजून सज्ञानही न झालेल्या मुलीने हुशारीने हे घातक पाऊल उचलल्याने पोलिसही चाट पडले आहेत. काळी जादूचा बहाणा करून पळून जाण्याची अक्कल करिनाला आली कुठून, हा अस्वस्थ करणारा प्रश्न असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.