हायलाइट्स:
- ८० हजार शेतकरी पीकविम्याच्या प्रतिक्षेत
- पावसाचा खंड पडल्याने पिकांचे नुकसान
- खरिपाच्या उत्पन्नात ५० टक्के घट होण्याची शक्यता
तालुक्यातील सुमारे ८० हजार शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळणे अपेक्षित असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे यांनी दिली. ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची आशा आहे. जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न पन्नास टक्के घट अपेक्षित असून, त्या निकषानुसार पिकविमा धारक शेतकऱ्यांना भरपाई रकमेच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी काढली आहे. यंदा जून महिना कोरडा गेला. तर जुलै महिन्यात झालेल्या पावसाने पिकांना आधार दिला.
परंतु, पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पिकांना वेळोवेळी पाणी न मिळाल्याने हलक्या आणि कोरडवाहू जमिनीतील पिके करपून गेली आहेत. तर मध्यम ते भारी दर्जाच्या जमिनीतील पिके कशीबशी तग धरून आहेत. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येणार आहे. गेल्या आठवड्यातील पावसाने गिरणा मोसम नद्या दुथडी भरून वाहत असल्या तरी खरिपाला त्याचा फार फायदा होण्याची शक्यता कमी आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार सुमारे ८० हजार शेकऱ्यांना पीकविम्याची भरपाई रक्कम मिळणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांना भरपाई रकमेची २५ टक्के रक्कम मिळाल्यास ऐन सणासुदीच्या तोडांवर काहीसा दिलासा मिळणार आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.