आयसीसी अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कप २०२४ च्या स्पर्धेचं आयोजन जानेवारी आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये होणार आहे. श्रीलंका या स्पर्धेच्या आयोजानाची जबाबदारी पार पाडणार होती. मात्र, श्रीलंका क्रिकेटमधील अनिश्चिचतता पाहता आयसीसीनं मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेकडील आयोजनाची जबाबदारी काढून घेत ती आता दक्षिण आफ्रिकेकडे देण्यात आली आहे.
आयसीसीनं अद्याप श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील निलंबनाची कारवाई कायम ठेवली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाला १० नोव्हेंबरला सस्पेंड करण्यात आलं होतं. मात्र, आयसीसीनं कारवाई केली असली तरी श्रीलंका क्रिकेटवर मोठा परिणाम होणार नाही. तिथलं क्रिकेट सुरु राहील, असं काही रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे.
श्रीलंकेच्या क्रिकेट संघानं वर्ल्ड कपमध्ये यंदा निराशाजनक कामगिरी केली. गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ नवव्या स्थानावर राहिला. ९ सामन्यांमध्ये श्रीलंकेनं केवळ २ सामन्यांमध्ये विजय मिळवला तर त्यांना ७ सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं.
श्रीलंकेचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत झाला होता, त्यामध्ये त्यांना १०२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पाकिस्ताननं त्यांच्यावर ६ विकेटने तर ऑस्ट्रेलियानं ५ विकेटने विजय मिळवला होता. श्रीलंकेनं नेदरलँड आणि इंग्लंड विरोधात विजय मिळवला. मात्र, भारताविरोधात त्यांना ३०२ धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं होत.