‘ईव्हीएम है तो मुमकीन है’:सत्ताधाऱ्यांच्याच पारड्यात प्रचंड मते कशी पडतात? उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला प्रश्न
24 तासांत 64 कोटी मते मोजणारी भारतीय ईव्हीएम हा भले अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांना पडलेला ‘प्रश्न’ असेल, पण भारतीय सुज्ञ नागरिकांसाठी मात्र ईव्हीएम हे मागील दहा वर्षांतील असंख्य अनुत्तरित राजकीय प्रश्नांचे ‘उत्तर’ आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून चार दिवस उलटूनही ईव्हीएमच्या ‘सुरस’ कथा चव्हाट्यावर येत आहेत त्या त्यामुळेच. अमेरिकन मस्क महाशयांनी आता भारतीय ईव्हीएमच्या अति वेगवान मतमोजणीबद्दल अचंबा व्यक्त केला. भारतीय जनमानस मात्र त्याच ईव्हीएममधून फक्त सत्ताधाऱ्यांच्याच पारड्यात प्रचंड मते कशी पडतात, या करामतीमुळे स्तंभित आहे. केवळ मस्कच नव्हे, तर ईव्हीएमवरून सगळेच अचंबित आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दैनिक सामानाच्या माध्यमातून ठाकरे गटाने यावर टीका केली आहे. सामना मधील अग्रलेख देखील वाचा…. महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता चार दिवस झाले. मात्र त्यातील ‘ईव्हीएम’च्या ‘भूमिके’चे कवित्व संपायची चिन्हे नाहीत. विशेषतः महाराष्ट्रात लागलेल्या निकालामधील ईव्हीएमचे ‘योगदान’ यावरून मोठ्या प्रमाणात वादंग, चर्चा, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता थेट अमेरिकन उद्योगपती आणि टेस्ला तसेच स्पेसेक्ससारख्या जगविख्यात उद्योगांचे प्रमुख एलॉन मस्क यांची भर पडली आहे. भारतातील ईव्हीएम प्रणालीबद्दल त्यांना प्रचंड अप्रूप वाटले आहे. ‘भारतातील ईव्हीएम यंत्रणेने एकाच दिवसात 64 कोटी मते मोजली आणि अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाची मोजणी 18 दिवसांनंतरही सुरूच आहे,’ अशा शब्दांत मस्क यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय ईव्हीएमच्या मतमोजणीच्या वेगावरून आपण अचंबित झालो आहोत, असेही मस्क यांनी म्हटले आहे. सुज्ञ नागरिकही ईव्हीएम यंत्रांबद्दल अचंबित काहींना यात मस्क यांनी भारतीय मतदान व्यवस्थेचे कौतुक केले असे वाटले आहे. ईव्हीएमबद्दल त्यांची प्रतिक्रिया म्हणजे ईव्हीएमच्या सत्यतेबाबतचे जणू प्रमाणपत्रच, असेच त्यांना वाटत आहे. मात्र याच मस्क महाशयांनी फक्त सहाच महिन्यांपूर्वी भारतीय ईव्हीएम यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘एआय’ किंवा माणसांकडून ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असा स्पष्ट आक्षेप मस्क यांनी त्या वेळी घेतला होता. एवढेच नव्हे तर ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्याचा सल्लाही दिला होता. मात्र आता त्याच मस्क महाशयांना म्हणे भारतीय ईव्हीएम यंत्रांनी एका दिवसात 64 कोटी मते कशी मोजली, याबद्दल आश्चर्याचा धक्का बसला आहे! मस्क महाशयच कशाला? भारतातील विरोधी पक्षांसह लाखो सुज्ञ नागरिकही ईव्हीएम यंत्रांबद्दल अचंबित आहेत.
‘ईव्हीएम है तो मुमकीन है’ गेल्या दहा वर्षांत झालेल्या विविध निवडणुकांत ‘ईव्हीएम’ नावाच्या ‘जादूगार’ यंत्रणेची कमाल दिसून आली आहे. त्यावर कडी केली आहे ती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी! अंधभक्त ‘मोदी है तो मुमकीन है’ असे म्हणत असतात, परंतु महाराष्ट्राच्या निकालांनी ‘ईव्हीएम है तो मुमकीन है’ हे सिद्ध केले आहे. भारतीय ईव्हीएमने 24 तासांत 64 कोटी मते मोजली म्हणून अमेरिकेतील एलॉन मस्क हैराण आहेत तर भारतीय जनता मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि घटक पक्षांच्या पारड्यात महाप्रचंड मत‘दान’ कसे झाले? विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 230 जागांचा ‘बंपर लकी ड्रॉ’ सत्ताधारी महायुतीला कसा लागला? या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे आणि त्यांचा तर्क ईव्हीएमजवळ येऊन थांबत आहे. रहस्यमय कथा ‘ईव्हीएम घोळ’ महाराष्ट्रात आणलेली ईव्हीएम आणि त्यांचे गुजरात-राजस्थान कनेक्शन, मतदान यंत्रे आणि त्यांच्या बॅटरी चार्जिंगबाबतचे गूढ, प्रत्यक्ष झालेले मतदान आणि ईव्हीएममधून बाहेर आलेल्या मतांमधील तब्बल 95 मतदारसंघांमधील तफावत अशा रहस्यमय कथा ‘ईव्हीएम घोळ’ या संशयाला बळकटी देणाऱ्याच आहेत. 24 तासांत 64 कोटी मते मोजणारी भारतीय ईव्हीएम हा भले अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांना पडलेला ‘प्रश्न’ असेल, पण भारतीय सुज्ञ नागरिकांसाठी मात्र ईव्हीएम हे मागील दहा वर्षांतील असंख्य अनुत्तरित राजकीय प्रश्नांचे ‘उत्तर’ आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून चार दिवस उलटूनही ईव्हीएमच्या ‘सुरस’ कथा चव्हाटय़ावर येत आहेत त्या त्यामुळेच. मोदींचा भाजप सत्तेत असेपर्यंत या सुरस कथा आणि त्याबाबतचा संशयकल्लोळ सुरूच राहील. अमेरिकन मस्क महाशयांनी आता भारतीय ईव्हीएमच्या अति वेगवान मतमोजणीबद्दल अचंबा व्यक्त केला. भारतीय जनमानस मात्र त्याच ईव्हीएममधून फक्त सत्ताधाऱयांच्याच पारडय़ात प्रचंड मते कशी पडतात, या करामतीमुळे स्तंभित आहे. केवळ मस्कच नव्हे, तर ईव्हीएमवरून सगळेच अचंबित आहेत!