‘एक हैं तो सेफ हैं’ आता देशाचा महामंत्र:‘खुर्ची फर्स्ट’वाल्यांना जनतेने नाकारले, भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
हरियाणानंतर महाराष्ट्रातील निवडणुकीतूनदेखील मोठा संदेश मिळाला आहे. तो म्हणजे एकजूट. ‘एक हैं तो सेफ हैं’ हा आता देशाचा महामंत्र बनला आहे. जनतेने ‘खुर्ची फर्स्ट’चे स्वप्न पाहणाऱ्यांना नाकारले आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदी शनिवारी सायंकाळी भाजप मुख्यालयात आले. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, काँग्रेसच्या ढोंगीपणाचा जनतेने पर्दाफाश केला आहे. देशातील मतदार ‘नेशन फर्स्ट’ च्या भावनेसह सोबत आला आहे. पंतप्रधानांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आपल्या मनोगताची सुरुवात ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणेने केली. काँग्रेस व त्यांची इकोसिस्टिम राज्यघटनेच्या नावावर खोटे बोलून, आरक्षणाच्या नावाखाली खोटे बोलून एससी, एसटी आणि आेबीसींना लहान-लहान गटात विभाजित करतील. काँग्रेस व त्यांच्या साथीदारांच्या या कटाला महाराष्ट्राने नाकारले. झारखंडमधील जनतेलादेखील मी नमन करतो. कोणीही ३७० मागे घेऊ शकत नाही मोदी म्हणाले, जगातील कोणतीही शक्ती कलम ३७० ला मागे घेऊ शकत नाही. संपूर्ण देशात आता एकच राज्यघटना चालेल…ही राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आहे. भारताची राज्यघटना आहे. कुणीही समोर किंवा पडद्यामागे देशात दोन राज्यघटना असल्याचे सांगेल…त्यास संपूर्ण देश आता नाकारेल. महाराष्ट्राने दाखवलं की तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा..: याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भावना मांडल्या. महाराष्ट्राने दाखवलं की तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा, असे ते मराठीतून बोलले.