मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगेल. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येईल. या सामन्यासाठीचे पंच आणि सामनाधिकाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. ही नावं जाहीर होताच भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.अंतिम सामन्यात रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि रिचर्ड कॅटलबोरो (इंग्लंड) पंच म्हणून काम पाहतील. वेस्ट इंडिजचे जोएल विल्सन तिसरे तर, न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी चौथे पंच असतील. सामनाधिकारी म्हणून अँडी पायक्राफ्ट काम बघतील. अंतिम सामन्यातील पंच म्हणून कॅटलबोरो यांचं नाव जाहीर झाल्यानं भारतीय चाहत्यांची चिंता वाढली आहे. कारण आयसीसीच्या स्पर्धांमध्ये कॅटलबोरो पंच असताना भारतीय संघाच्या पदरी निराशा पडली आहे. टीम इंडिया महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पराभूत झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये कॅटलबोरो पंच होते. दोन्ही सामने भारत हरला. यावर्षी संपन्न झालेल्या कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कॅटलबोरो तिसरे पंच होते. याशिवाय २०१४ मध्ये टी-२० विश्वचषक, २०१५ मधील एकदिवसीय विश्वचषक, २०१६ मध्ये झालेला टी-२० विश्वचषक, २०१७ मधील चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात कॅटलबोरो पंच होते. या सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला. ५० वर्षांच्या कॅटलबोरो यांना क्रिकेट खेळण्याचाही अनुभव आहे. ते ३३ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. त्यांच्या नावावर १४४८ धावा आहेत. यंदाच्या विश्वचषकात स्पर्धेत भारतानं १० पैकी १० सामने जिंकले आहेत. भारतीय संघ स्पर्धेतला एकमेव अजिंक्य संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियानं १० पैकी ८ सामने जिंकले आहेत. पहिले दोन सामने हरल्यानंतर कांगारुंनी सलग ८ विजय मिळवले. भारतानं उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेला ३ गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली.