म. टा. प्रतिनिधी, मुंबई : आगमन मिरवणूकांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकात होणारी प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वे, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा अशा शतकोत्तर परंपरा असलेल्या गणेशाच्या दर्शनासाठी शहर-उपनगरातून हजारो भाविक गर्दी करतात. गणेश मंडळापासून जवळचे स्थानक म्हणून चिंचपोकळी आणि करी रोडमध्ये यामुळे प्रचंड गर्दी होते. चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकावर एकच फलाट असल्याने तेथे मर्यादित जागा उपलब्ध आहे. यामुळे आता गर्दीच्या नियोजनासाठी स्थानकाबाहेर जाण्यासाठी व स्थानकात येण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उद्घोषणा यंत्रणेच्या माध्यमाने गणेशभक्तांना सूचना देण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिंदे सरकारने मराठ्यांसाठी GR काढला, पण जरांगे पाटील ‘सरसकट’वर अडले; उपोषणाबाबत मोठी घोषणा!

गणेशोत्सव काळात रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दलासह महाराष्ट्र सुरक्षा दल आणि होमगार्ड अशा सुरक्षा यंत्रणांचा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे. रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारावरील तिकीट खिडकी, फलाट आणि पादचारी पुलावर कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. चिंचपोकळी, करी रोडसह दादर, अंधेरी, घाटकोपर स्थानकांमध्येही आवश्यकतेनुसार सुरक्षा यंत्रणेतील अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

पुलांचा वापर करा

चिंचपोकळी, करी रोड स्थानकात एकाच दिशेने ये-जा करण्याची व्यवस्था आहे. यामुळे गर्दी वाढते. हे टाळण्यासाठी या स्थानकांतील अन्य पुलांच्या मदतीने स्थानकाबाहेर पडावे तसेच स्थानकात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारासह अन्य पुलांचा वापर करावा, लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य द्यावे, अफवा पसरवू नयेत अशी जनजागृती करण्यात येणार असल्याचे रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *