बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा विजय:काका विरुद्ध पुतण्याच्या लढईत काकांनी मारली बाजी; पक्षाला राज्यातही मतदारांची साथ
बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. आता त्यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. काका विरुद्ध पुतण्या अशा या लढतीमध्ये अखेर काका अजित पवार यांचा विजय झाला असून पुतण्या युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वात हॉट सीट म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जात होते. या मतदारसंघातून अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते. पवार विरुद्ध पवार अशा झालेल्या या थेट सामन्यात अजित पवार यांनी बाजी मारली आहे. अजित पवार यांनी या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. या मतदारसंघाबरोबरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातही तिसरा क्रमांकाचा पक्ष म्हणून मान्यता मिळवली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या विजयाकडे विजयाचे महत्त्व अधिक वाढले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला पूर्ण बहुमतासह कौल दिला आहे. महायुतीतील तिन्ही घटक पक्ष पहिल्या तीन क्रमांकाचे पक्ष ठरले आहेत. यात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाविकास आघाडी मधील काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष पहिल्या तीन मध्ये स्थान मिळवू शकलेले नाही.