कुत्र्यास खाण्याच्या बहाण्याने बोलवून खड्डयात फेकले:नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळले, विकृतीचा कळस गाठणारी घटना
पुण्यातील मुंढवा परिसरात केशवनगर मध्ये झेड कॉर्नर येथील आर.एस.इंटरप्राईजेसचे शेजारी एका तरुणाने चॉकलेटी पांढऱ्या कुत्र्याला खाण्याच्या बहाण्याने बोलावले. त्यानंतर त्याला खड्ड्यात टाकून त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी बिरू डोलारे (वय -40 ,राहणार -मुंढवा, पुणे) याच्यावर मुंढवा पोलिस ठाण्यात भारतीय कलम 325 सह, प्राणी क्रूरता अधिनियम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पद्मिनी पीटर स्टम्प (वय -66, राहणार -भवानी पेठ ,पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे .आरोपी बिरू डोलारे यांनी एका चॉकलेटी पांढऱ्या कुत्र्याला खाण्यासाठी बोलावले .त्यानंतर त्याच्या डोक्यावर लाकडी बांबूनी मारहाण केली आणि त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याचे पाय जाड दोरीनेबांधून त्याला एका खड्ड्यांमध्ये टाकले. त्याच्या अंगावर प्लास्टिक ,कागद ,लाकडे व पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळले. यामुळे त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. माळी करत आहे. दुसरीकडे, मांजरी परिसरातील एका बोगस डॉक्टर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांजरी परिसरात घुले कॉलनी या ठिकाणी कानिफनाथ क्लिनिक नावाचे रुग्णालय सुरू करून, कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर व्यवसाय एकजण करत असल्याची माहिती आरोग्य विभागास मिळाली होती. त्यानुसार आरोपी मारुती कालिदास बिडवे (रा.मांजरी, पुणे ) याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉक्टर स्वाती घनवट (वय – 46) यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपीकडे बी.इ.एम.एस ही पदवी नसताना ही, सदर डॉक्टरची पदवी क्लिनिकवर लावली होती आणि वैद्यकीय व्यवसाय करत होता. त्याच्या क्लिनिकच्या फलकावरून निदर्शनास आले की, त्याची पदवी योग्य नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमाचे कलम 331 चे उल्लंघन केल्याने महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमचे कलम 33 नुसार तक्रार आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.