नितिन नाईक
Nitin.Naik@timesgroup.com

अहमदाबाद: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या सामन्यांसाठी तयार केलेल्या खेळपट्ट्यांची खूपच चर्चा होत आहे. आता अंतिम सामनाही याला अपवाद नाही. त्यातच एकंदरीत चित्र पाहता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासारखी खेळपट्टी या सामन्याच्या वेळी असण्याची शक्यता आहे. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानची अंतिम लढत १९ नोव्हेंबला नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

द्रविड यांच्याकडून पाहणी

भारतीय संघाला अनुकूल खेळपट्टीची चर्चा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या चर्चेमुळे वाढली आहे. प्रत्येक सामन्यासाठी भारतीय संघ शहरात दाखल झाल्यानंतर द्रविड आपल्या सहकाऱ्यांसह थेट मैदानावर जात आहेत. मैदानावरील क्युरेटरसह चर्चा करीत आहेत. भारतीय संघातील खेळाडू हॉटेलमध्ये जात असताना द्रविड सहकाऱ्यांसह मैदानावर येत असल्यामुळे ही चर्चा जास्तच वाढली.

सेमीफायनलमधील विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; १९ नोव्हेंबरला या ५ चुका टाळल्या तर टीम इंडिया होणार वर्ल्ड चॅम्पियन
क्युरेटरसह चर्चा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर तयार केलेली खेळपट्टी काळीशार आहे. त्यामुळे ही खेळपट्टी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासारखी असण्याची शक्यता आहे. त्या सामन्यांत चेंडू खूप खाली राहत होते. महंमद सिराजच्या खाली राहिलेल्या चेंडूवर बाबर आझम बाद झाला होता. शुक्रवारी खेळपट्टीवरील आच्छादन दूर केल्यानंतर द्रविड आणि रोहित शर्मा यांनी क्युरेटरसह चर्चा सुरू केली. त्या संभाषणात काही मिनिटांतच गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हांबरे, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी. दिलीप, फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोडही सहभागी झाले. यानंतर द्रविड यांनी मोबाइलवरून दीर्घ चर्चा केली आणि सहकारी प्रशिक्षकांनी सरावाकडे लक्ष केंद्रित केले.

भारतीय संघाचा सराव

त्या सरावात रोहित शर्माने स्लीपमध्ये जमिनीलगतच्या झेलचा जास्त सराव केला. हे चित्रच नक्कीच सुचित करणार होते. रोहितने सराव सुरू करण्यापूर्वी माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर आणि महंमद कैफ यांच्यासह चर्चा केली. बांगर २००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळी भारतीय संघाचे फलंदाज प्रशिक्षक होते. त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला होता. शुक्रवारचा सराव सक्तीचा नव्हता. त्यात रोहितसह अष्टपैलू रवींद्र जडेजा, फिरकी गोलंदाज अश्विन, यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन, उपकर्णधार लोकेश राहुल सहभागी झाले होते. अश्विनने फलंदाजीचा सराव केला. त्यातही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीचा सामना करण्यावर जास्त भर होता.

वर्ल्डकपमध्ये भारताने केला आजवर कोणालाही न जमलेला विक्रम; अय्यरने तर थेट गांगुलीचा विक्रम मोडला
तीन फिरकी गोलंदाज?

अश्विनचा सराव बघितल्यास भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाज खेळवू शकेल असे संकेत मिळत आहेत. या खेळपट्टीवरून चेंडू कमी वेगाने येईल; तसेच फिरकीला जास्त साथ देईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे. त्याचबरोबर तीन वेगवान आणि दोन फिरकी असे पाच गोलंदाज खेळवण्याचा फॉर्म्युला धरमशाला येथील न्यूझीलंडविरुद्धच्या साखळी लढतीपासून यशस्वी होत आहे. त्यामुळे त्यात बदल करू नये, असाही विचार आहे.

आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार मायदेशी

भारताच्या उपांत्य लढतीपूर्वी खेळपट्टी ऐन वेळी बदलल्यावरून वाद झाला होता. आता अंतिम सामन्यांस ४८ तास असताना आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार अँडी अॅटकिन्सन मायदेशी परतले आहेत. त्यामुळे बीसीसीआयच्या खेळपट्टी तज्ज्ञांनी जबाबदारी घेतली आहे. त्याच वेळी आता अॅटकिन्सन यांना आयसीसी निरोप देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘अॅटकिन्सन नरेंद्र मोदी स्टेडियमवर असणारच नाहीत. त्यांच्याकडे असलेली जबाबदारी संपली आहे. त्यात कोणताही वाद नाही. आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार अंतिम सामन्यांस उपस्थित असावेत, असा कोणताही नियम नाही,’ असे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. अॅटकिन्सन यांनी उपांत्य लढतीपूर्वी खेळपट्टी बदलण्याच्या निर्णयावर टीका केली होती. त्यांनी पाठवलेला इ-मेल लिक झाला होता.

फायनलपूर्वी खेळपट्टीचा खेळ?

अहमदाबादला यापूर्वी स्पर्धेतील चार सामने झाले आहेत. या लढती झालेल्यांपैकी एका खेळपट्टीवर सामना होणार की पूर्णपणे नवीन खेळपट्टी असणार, याबाबत नेमके समजू शकले नाही. मात्र, खेळपट्टीवरून मोठ्या प्रमाणावर रोलर फिरवण्यात येत होता. ‘काळी माती असलेल्या खेळपट्टीवर रोलर फिरवल्यास तिचा वेग कमी होतो. या खेळपट्टीवर फटकेबाजी करता येते; पण त्याच वेळी चेंडूच्या रेषेत येऊन सातत्याने चेंडू फटकावता येत नाही. या खेळपट्टीवर ३१५ धावांचेही संरक्षण करता येते. त्याचबरोबर धावांचा पाठलाग सोपा नसतो,’ असे गुजरात क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Latest Sports News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *