कोलंबो: आशिया चषकातील सुपर ४ मध्ये काल भारत-पाकिस्तान यांच्यात लढत रंगली. पण पावसामुळे सामना थांबवावा लागला. २ सप्टेंबरला गट साखळीत भारत वि. पाकिस्तान सामना झाला होता. पण हा सामनादेखील पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. काल सुपर ४ मध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने आले. भारतीय सलामीवीरांनी दे दणादण सुरुवात केली. पण पावसामुळे खेळ थांबवावा लागला. सुदैवानं राखीव दिवस ठेवण्यात आल्यानं उर्वरित सामना आज खेळवण्यात येईल.

काल २४.१ षटकांचा खेळ झाला. त्यात भारतानं २ बाद १४७ धावा केल्या. यानंतर पावसामुळे सामना होऊ शकला नाही. तो आज होईल. पण आजही पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोलंबोत पाऊस होण्याची शक्यता ५० टक्के आहे. पावसामुळे काल अपू्र्ण राहिलेला सामना आज पूर्ण करण्याचा प्रयत्न पंच करतील. ५० षटकांचा सामना होऊ न शिकल्यास त्यापेक्षा कमी षटकांचा सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.

पावसामुळे आजचा सामना झालाच नाही, तो रद्दच करावा लागला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळेल. त्यामुळे अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन्ही संघांना आपले उर्वरित सामने जिंकावेच लागतील. भारताला बांग्लादेश आणि श्रीलंकेचा पराभव करावा लागेल. पाकिस्ताननं आधीच बांग्लादेशला सात गडी राखून मात दिली आहे. त्यामुळे त्यांचा एकमेव सामना श्रीलंकेशी होईल. राखीव दिवसाच्या दुसऱ्याच दिवशी भारताला श्रीलंकेचा सामना करायचा आहे. म्हणजेच भारत वि. श्रीलंका सामना उद्याच आहे.

भारत वि. पाकिस्तान सामन्यात आतापर्यंत काय घडलं?
पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी पाहता प्रथम फलंदाजीचा निर्णय अपेक्षित होता. पण पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमनं गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मानं स्फोटक सुरुवात केली. रोहितनं शाहिन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात षटकार खेचला.

दुसऱ्या बाजूनं गिल आफ्रिदीवर तुटून पडला. त्यानं तिसऱ्या आणि पाचव्या षटकांत (दोन्ही षटकं आफ्रिदीनं टाकली) तीन-तीन चौकार मारले. नसीम शाहची गोलंदाजी त्या तुलनेत चांगली होती. त्यानं रोहित शर्माला अनेकदा अडचणीत आणलं. यानंतर बाबर आझमनं उपकर्णधार शादाब खानला पाचारण केलं. पण रोहित शर्मानं त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला.

गिल आणि रोहितनं शतकी सलामी दिली. दोघांनी अर्धशतकं पूर्ण केली. मात्र त्यानंतर शादाबच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना रोहित बाद झाला. त्यापाठोपाठ गिलला आफ्रिदीनं माघारी धाडलं. त्यानंतर कोहली आणि राहुलनं पडझड रोखली. सध्या राहुल १७, तर कोहली ८ धावांवर नाबाद आहे. २४.१ षटकांत भारताच्या २ बाद १४७ धावा झाल्या आहेत. गिल आणि रोहित मैदानात असताना भारताची धावगती ७.५ च्या घरात होती. दोघे बाद झाल्यानंतर ती मंदावली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *