मुंबई: सलग नऊ साखळी लढती जिंकून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. साखळीतील वर्चस्व, अपराजित मालिकेचे महत्त्व आगामी दोन लढतींवर ठरणार आहे, याची भारतीय संघाला कल्पना आहे. या परिस्थितीत भारतीय संघास उद्या, बुधवारी उपांत्य फेरीत कायम धोकादायक असलेल्या न्यूझीलंडच्या खडतर आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. या मैदानावरील यंदाच्या वर्ल्ड कप लढतींचा इतिहास बघितल्यास सुरुवातीच्या षटकातील फलंदाजी महत्त्वाची ठरत आहे.

गेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडूनच उपांत्य फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्याचा बदला म्हणून या उपांत्य लढतीकडे बघितले जात आहे. भारताने धरमशाला येथे न्यूझीलंडची स्पर्धेतील विजयी वाटचाल रोखली होती. मात्र, या सामन्यात भारताचा कस नक्कीच पणास लागला होता. त्यातच वानखेडे स्टेडियमवरील लढत नक्कीच सोपी नसेल. या स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यांचा विचार केल्यास पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ३५७ आहे, तर दुसऱ्या डावातील १८८. दुसऱ्या डावातील सरासरी ग्लेन मॅक्सवेलच्या द्विशतकाने उंचावली आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.

भारत-न्यूझीलंड लढत ग्लेन मॅक्सवेलची अविश्वसनीय द्विशतकी खेळी झालेल्या खेळपट्टीवरच होणार आहे. या मैदानावरील चारपैकी तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे, तर मॅक्सवेलने हे पूर्ण वर्चस्व राहणार नाही याची काळजी घेतली. या मैदानावर धावांचा पाठलाग करताना पहिल्या १५ षटकांत फलंदाजांचा कस लागतो. त्यामुळे पहिल्या डावातील १ बाद ५२ च्या तुलनेत दुसऱ्या डावातील सरासरी ४ बाद ४२ आहे. सीमचे आव्हान पंधराव्या षटकांपर्यंत कायम असते. वीस षटकांनंतर फलंदाजी सोपी होते; पण तोपर्यंतची स्थिती आव्हान अवघड करीत असते.

न्यूझीलंडचा संघ हुशार आहे. त्यांची कामगिरी महत्त्वाच्या स्पर्धेत उंचावते. ते जागतिक कसोटीचे विजेते आहेत. त्यांनी गेल्या पाच स्पर्धांत उपांत्य फेरी गाठली आहे. गेल्या दोन स्पर्धांत त्यांनी अंतिम फेरी गाठली आहे. उत्तम सांघिक कामगिरी करणाऱ्या या संघास क्वचितच एखाद्या खेळाडूची उणीव भासते. त्यामुळेच न्यूझीलंडला सर्वाधिक धोकादायक मानले जाते. हीच बाब भारतीयांसाठी त्रासदायक आहे.

सँटनरचे आव्हान

भारतासमोर सर्वाधिक आव्हान वेगवान गोलंदाजांपेक्षा मिचेल सँटनरचे असेल. सँटनरने गतस्पर्धेत वेगवान गोलंदाजीस पोषक वातावरणात ३४ धावांत दोघांना बाद केले होते, तर धरमशाला येथे ३७ धावांत एक अशी त्याची कामगिरी होती. त्याने या स्पर्धेत बाद केलेल्या १६पैकी एकच फलंदाज डावखुरा आहे.

प्रतिस्पर्ध्यातील लढतीत

– भारताचा न्यूझीलंडविरुद्धच्या ११७ पैकी ५९ सामन्यांत विजय, तर ५० पराभव. एक बरोबरी आणि सात अनिर्णित

– भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील ३९ पैकी ३० लढती जिंकल्या आहेत, तर ८मध्ये पराभव. एक अनिर्णित

– भारताने २०१० पासून न्यूझीलंडविरुद्धच्या ३६ पैकी १९ लढती जिंकल्या आहेत, तर १४मध्ये पराभव आणि एक बरोबरी

– भारताने न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ५७ पैकी २४ सामने जिंकले आहेत, तर २८मध्ये पराभव.

– भारताचा न्यूझीलंडविरुद्ध धावांचा पाठलाग केलेल्या सामन्यांत ६० पैकी ३५ सामन्यांत विजय, तर २२ मध्ये पराभव. एक बरोबरी आणि दोन अनिर्णित

वानखेडे स्टेडियमवर…

– भारताचा वानखेडेवरील २१पैकी १२ लढतींत विजय, तर नऊ लढतींत पराभव

– भारताने या मैदानावरील न्यूझीलंडविरुद्धची एकमेव वन-डे गमावली आहे. २०१७ मधील या लढतीत न्यूझीलंडचा सहा चेंडू आणि सहा विकेट राखून विजय

– न्यूझीलंडने या मैदानावरील तीनपैकी दोन लढती जिंकल्या आहेत, तर एकमध्ये हार. वर्ल्ड कपमधील लढतीत कॅनडाविरुद्ध विजय; पण श्रीलंकेविरुद्ध हार

– भारताचा या मैदानावरील वर्ल्ड कपमधील पाचपैकी तीन सामन्यांत विजय आणि दोनमध्ये पराभव

– भारताचा या मैदानावरील दोन्ही अंतिम लढतीत विजय; पण दोन्ही उपांत्य लढतीत पराभव. १९८७ च्या स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध, तर १९८९ च्या नेहरू कप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध

– भारताने या मैदानावर पाचपेक्षा जास्त संघ खेळलेल्या स्पर्धेतील सहापैकी तीन सामने जिंकले आहेत, तर तीनमध्ये पराभव

प्रतिस्पर्ध्यातील निर्णायक लढतीत

– भारताचा ५पैकी दोन सामन्यांत विजय, तर तीनमध्ये पराभव

– उपांत्य फेरीच्या दोनपैकी एका लढतीत भारताचा विजय आणि एक पराभव

– भारताचा १९८५ च्या जागतिक चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेतील ७ विकेट आणि ३९ चेंडू राखून विजय.

– भारताचा २०१९ च्या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत १८ धावांनी विजय.

– प्रतिस्पर्ध्यातील अंतिम फेरीच्या तीनपैकी एकाच सामन्यांत भारताचा विजय आणि त्याचवेळी दोन लढतींत पराभव.

– भारताचा हा अंतिम फेरीतील एकमेव विजय १९८८ च्या शारजा कप स्पर्धेत. याच वेळी २०००च्या आयसीसी नॉकआउट स्पर्धेत न्यूझीलंडचा चार विकेट आणि दोन चेंडू राखून विजय, तसेच झिम्बाब्वेतील २००५ च्या तिरंगी स्पर्धेत भारताविरुद्ध ६ विकेट आणि ११ चेंडू राखून सरशीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *