१९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय वायुसेनेची ‘सूर्य किरण एरोबॅटिक टीम’ ‘एअर शो’ सादर करणार आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. संरक्षण विभागाचे गुजरात जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणाले की, सूर्यकिरण एरोबॅटिक संघ मोटेरा परिसरातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांसाठी आपल्या स्टंटने लोकांना रोमांचित करेल.
पीआरओने एका निवेदनात म्हटले आहे की एअर शोचा सराव शुक्रवार आणि शनिवारी होईल. बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून भारताने वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर गुरुवारी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ३ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीममध्ये सामान्यतः नऊ विमानांचा समावेश असतो आणि त्यांनी देशभरात अनेक एअर शो केले आहेत.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून जुना बदला घेणार
बरोबर २० वर्षांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषकात अंतिम सामना खेळला गेला होता. तो अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला होता. मात्र, दोन दशकांनंतर पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत. यावेळी रोहित सेनेला जुना बदला नक्कीच घ्यायचा असेल. त्यांना अहमदाबादमध्ये पराभूत करून चमकदार ट्रॉफी जिंकायची आहे.