गोपाळ गुरव, नवी दिल्ली : सध्या वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. विराट कोहलीने सचिनचा शतकांचा विक्रम मोडला. या वर्ल्ड कपमध्ये कोहलीसह अनेकांनी विक्रमाच्या ‘बुक’मध्ये आपली नावे नोंदली. क्रिकेट शौकिनांचे लक्ष याकडेही असते. असे विक्रम किंवा आकडेवारी क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीचा चालता-बोलता इतिहास असतो. त्यावरून खेळाडूंची कामगिरी लक्षात येते. त्यामुळे ही आकडेवारी महत्त्वाची असते.

जबाबदारी कोणाची?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ही क्रिकेटची जागतिक प्रशासकीय संस्था आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिनिधींनी सन १९०९ मध्ये ‘इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ म्हणून त्याची स्थापना केली. १९६५मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) असे नामकरण झाले. आयसीसीचे मुख्यालय दुबई येथे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कार्यक्रम आयसीसी निश्चित करते. आयसीसीचे सध्या १०८ सदस्य देश आहेत. दोन देशांतील संघांमध्ये मालिका निश्चित करणे, वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धा घेण्याचे अधिकार आयसीसीकडे असतात. तेव्हा या सर्व सामन्यांमधील आकडेवारीची नोंद करण्याची जबाबदारी आयसीसीकडे असते.

आयसीसी काय करते?

आयसीसीचा स्वतंत्र सांख्यिकी विभाग असतो. प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्याची नोंद आयसीसीकडे असते. तसे ‘स्कोअर शीट’ आयसीसीकडून आयोजक देशाला दिले जाते. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाचा स्वतंत्र्य सांख्यिकी विभाग असतो. त्यांचे सदस्य सामन्यावेळी प्रत्यक्ष मैदानात उपस्थित असतात. जसे की सध्या भारतात वर्ल्ड कप सुरू आहे. यादरम्यान प्रत्येक सामन्याच्या ठिकाणी बीसीसीआयचे स्कोअरर नोंदी ठेवत असतात. फलंदाजाने केलेल्या धावा, गोलंदाजाचे बळी, यष्टिचीत, भागीदारी, झेल, धावबाद या सर्वांची नोंद त्यांच्याकडून केली जाते. हे ‘स्कोअरशीट’ आयसीसीकडे पाठविले जाते. आयसीसीचा विभागही याकडे लक्ष ठेऊन असतो. देशांतर्गत सामने, ‘आयपीएल’सारख्या वेगवेगळ्या लीग यासाठी त्या त्या देशांचा सांख्यिकी विभाग आणि वेबसाइट असतात. त्याचा आयसीसीशी संबंध नसतो. बीसीसीआयकडे आयपीएलच्या आयोजनाचे हक्क आहेत. आयपीएलची स्वतंत्र वेबसाइट आहे. त्यावर सर्व आकडेवारी आहे. ती अधिकृत असते.

२० वर्षांनंतर भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्डकप फायनल, जाणून घ्या विजेतेपदाच्या सामन्याची तारीख, ठिकाण, वेळ आणि संपूर्ण संघ
वेबसाइटच्या नोंदी अद्ययावत?

क्रिकेट सामन्याचे विक्रम, आकडेवारी आणि सामन्यादरम्यान नोंदी ठेवणाऱ्या अनेक वेबसाइट आहेत. यात विस्डेन, क्रिकबझ, क्रिकइन्फो, ईएसपीएन, क्रिकेटअर्काइव्ह अशा अनेक वेबसाइट आहेत. ज्यांच्याकडे हे सर्व विक्रम स्मरणात ठेवणारी ‘सॉफ्टवेअर’ आहेत. ज्यात पूर्ण सामन्यांचे स्कोअरशीट असते. सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, सर्वाधिक विकेट अशी सर्व आकडेवारी त्यावर आहेत. सामना सुरू असतानाच ते अपडेट होत जातात. २००६मध्ये आसीसीने ‘एमसीसी’च्या नियमानुसार कुठले सामने अधिकृत आणि कुठले अनधिकृत, हे स्पष्ट केले. आयसीसीकडे नोंद असलेल्या संघांचीच आकडेवारी ग्राह्य धरली जाते.

पूर्वीची पद्धत काय?

महाराष्ट्राचे सांख्यिकीतज्ज्ञ सुधीर वैद्य म्हणाले, ‘आमच्या काळात कम्प्युटर नव्हते. आमच्याकडे प्रथम श्रेणीपासून आंतरराष्ट्रीय सामन्यापर्यंत सामन्यांचे स्कोअरशीट असायचे. त्यावरून आम्ही वह्यांमध्ये नोंदी करायचो. हीच आकडेवारी बोर्डाला पाठवायचो.’ अनेक वेबसाइट आल्यामुळे वाचक, प्रेक्षकांना आता डायरी घेऊन नोंद करावी लागत नाही. पूर्वी काही पत्रकारही डायऱ्यांमध्ये नोंदी ठेवत. हीच माहिती पुढे वेबसाइटवर अपलोड करण्यात आली. आणि ही सर्व आकडेवारी अधिकृत झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आकड्यांमध्ये फसवणूक किंवा चूक झाल्याचे कधी निदर्शनास आले नाही.

इतर खेळांचे काय?

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी १८५ सामन्यांत ५७० गोल केल्याची नोंद आहे. मात्र, त्यांच्या इतर गोलची नोंद झालीच नाही. फुटबॉलमध्येही पूर्वी अशा नोंदी न झाल्याने अनेक महान खेळाडूंच्या नावावरील गोलची संख्या कमी दिसते. अर्थात, त्या वेळी आकडेवारीचे महत्त्व फार नव्हते. सामना जिंकला किंवा हरला एवढ्यावरच लक्ष केंद्रित केले जात होते. मात्र, आता प्रत्येक खेळातील सांख्यिकी विभाग या आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेऊन असतो. भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या भारतातील नामवंत हॉकी सांख्यिकीतज्ज्ञ बी. जी. जोशी आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडील नोंदी यात तफावत होती. त्या वेळी जोशी यांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघास सप्रमाण त्यांची चूक दाखवली. क्रिकेट, फुटबॉलच्या तुलनेत इतर खेळात व्यावसायिकतेत कमी पडतात. त्यामुळे अद्ययावत नोंदी कधी कधी ठेवल्या जात नाहीत.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे-अजितदादा खंदे बॅट्समन, भक्कम विकेटकिपिंग करायला मी आहेच: देवेंद्र फडणवीसSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *