अहमदाबाद : अवघे क्रिकेटविश्व ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आज, रविवारी जगज्जेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यात बाजी मारून २०११मधील विजेता भारतीय संघ जगज्जेतेपदाची तपपूर्ती जगज्जेतेपदानेच करण्यासाठी उत्सुक आहे.

-एकच नारा

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार असून, १ लाख ३२ हजार आसनक्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये भारतीय संघाला लाखमोलाचे प्रोत्साहन मिळणार आहे. सारे स्टेडियम भारतीय संघाच्या जर्सीच्या अर्थात निळ्या रंगात न्हावून निघेल, यात शंका नाही. कारण, शनिवारीच चाहत्यांनी स्टेडियम बाहेर मोठी गर्दी केली होती. हे चाहते एकच नारा देत होते, तो म्हणजे ‘जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा…’ हाच नारा रविवारी स्टेडियम आणि परिसर दणाणून सोडणार आहेत.

-संधीचे सोने

भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये अत्यंत सफाईदार खेळ केला आहे. प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका चोखपणे पार पाडली आहे. आता वर्ल्ड कप केवळ एका पावलावर आहे. त्यामुळे आता भारतीय संघाने या संधीचे सोने करावे, अशी आशा तमाम भारतीय चाहते बाळगून आहेत.

-फलंदाज फॉर्मात

आतापर्यंत कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. त्याने आक्रमक सुरुवात करून दिल्याने इतरांवरील दडपण हलके होत आहे. त्याला शुभमन गिलकडूनही चांगली साथ लाभत आहे. स्टार फलंदाज विराट कोहली सुपर फॉर्ममध्ये आहे. त्याने या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ७११ धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकांचा समावेश आहे. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर जबरदस्त कामगिरी करीत आहे. त्याने गेल्या दोन सामन्यांत नेदरलँड्स आणि न्यूझीलंडविरुद्ध शतके झळकावली आहेत. त्याआधी, त्याने दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध अर्धशतके झळकावली आहेत. साहजिकच श्रेयसही चांगल्या फॉर्मात आहे. लोकेश राहुल, रवींद्र जाडेजा आपली भूमिका चोखपणे पार पाडत आहेत.

पीच पाहिलं, सगळ्या बाजूंनी फोटो काढले, ‘भारत पाक’वरून शेरेबाजी, पॅट कमिन्स पत्रकारांना काय म्हणाला?
-गोलंदाजीतील ताकद

एकेकाळी भारतीय संघ बऱ्यापैकी फलंदाजांवर अवलंबून असायचा. मात्र, आता चित्र बदलले आहे. भारतीय संघाकडेही प्रतिस्पर्ध्याच्या मनात धडकी भरवतील, असे गोलंदाज आहेत. या वर्ल्ड कपमधील आतापर्यंतच्या दहापैकी आठ सामन्यांत भारतीय संघाने प्रतिर्स्पध्यांचा डाव गुंडाळला आहे. साहजिकच भारतीय गोलंदाजीची ताकद खूप वाढली आहे. विशेषत: वेगवान गोलंदाजांनी प्रभावी मारा केला आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी वेळोवेळी हे सिद्ध केले आहे. फिरकी गोलंदाजांकडूनही कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा मोलाची भूमिका बजावत आहे. मधल्या टप्प्यात धावांच्या गतीला ब्रेक लावण्याचे काम ते चोखपणे पार पाडत आहेत. मोक्याच्या क्षणी ते विकेट मिळवून देत आहेत.

-उत्सुकता शिगेला

भारतीय संघाची उत्तम भट्टी जुळून आली आहे. त्यामुळे अंतिम लढतीसाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमी दिसत आहे. भारतीय संघाने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवूनच वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात केली होती. अर्थात, ती साखळी लढत होती. अंतिम लढतीचे दडपण वेगळे असते. अंतिम सामन्याचे दडपण शांतपणे हाताळून आपल्या मोहिमेची सांगता ऑस्ट्रेलियाला हरवून जगज्जेतेपदानेच करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. २००३च्या वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातच जेतेपदासाठी लढत झाली होती. त्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती.आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ त्या पराभवाचे उट्टे काढून जगज्जेतेपदाला गवसणी घालणार का, याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला आज, दोन्ही संघांची बलस्थाने आणि कमकुवत बाजू कोणत्या?
-चिवट ऑस्ट्रेलिया

दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघ सहाव्या जगज्जेतेपदासाठी उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांना भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करावी लागली होती. त्यानंतर मात्र त्यांनी सलग आठ विजय नोंदवले आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाची ७ बाद ९१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या अद्वितीय अशा तडाखेबंद द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २९२ धावांचे लक्ष्य पार केले होते. अर्थात, ऑस्ट्रेलिया सहजी हार मानणारा संघ नाही.ऑस्ट्रेलियाची भिस्त ही सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर असणार आहेत. तो आणि ट्रेव्हिस हेड सुरुवात कशी करून देतो, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१३ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला झुंजावे लागले होते. मिचेल मार्शला खातेही उघडता आले नव्हते. मार्नस लबुशेन, स्टीव स्मिथलाही झुंजावे लागले होते.

-गोलंदाजीत भिस्त

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत आतापर्यंत फिरकीपटू अॅडम झाम्पाने प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक २२ विकेट घेतल्या आहेत. मिचेल स्टार्क, कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेझलवूड यांनी वेळो वेळी स्वत:ला सिद्ध केले आहे.

-रोहित शर्माने काय प्लॅनिंग सांगितलं?

दोन वर्षांपासून अंतिम सामन्यांची तयारी सुरू आहे. कोण खेळआडू या लढतीसाठी असतील? त्यांना संघात नेमकी कोणती जबाबदारी असेल, हे सांगितले होते. कोणता खेळाडू कधी फलंदाजी करणार? कोणता गोलंदाज कधी गोलंदाजी करणार? कोण कुठे क्षेत्ररक्षण करणार? हे आधीच ठरले होते. अंतिम सामन्यातही हे घडेल, अशी आशा आहे. आम्ही विश्वविजेते होण्यासाठी जीव तोडून मेहनत करू.

-यातून संघ निवडणार :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, प्रसिध कृष्णा, शार्दूल ठाकूर.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड, मार्नस लबुशेन, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, मार्कस स्टॉइनिस, मिचेल मार्श, जोश इंग्लिस, जोश हेझलवूड, अॅलेक्स कॅरी, शॉन अॅबट, कॅमेरॉन ग्रीन.

दुखापतींनी छळलं, बायकोच्या आरोपांनी घेरलं, पण मोहम्मद शामी मागे हटला नाही, त्याचीच ही संघर्षकथाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *