वृत्तसंस्था, टोरांटो/नवी दिल्ली: फुटीरतावादी दहशतवाद्याच्या हत्येप्रकरणात भारत सरकारच्या एजंटचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला असून, त्यावरून त्यांनी भारताच्या कॅनडातील वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला परत पाठवले आहे. तर, भारताने कॅनडाचे आरोप फेटाळले असून, त्यांना त्याच भाषेत उत्तर देताना कॅनडाच्या भारतातील एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला पाच दिवसांत देश सोडण्याचा आदेश दिला आहे.हरदीपसिंग निज्जर या ४५ वर्षीय खलिस्तानवादी दहशतवाद्याची १८ जून रोजी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथे हत्या झाली होती. एका गुरुद्वाराबाहेर दोन मारेकऱ्यांनी त्याला गोळ्या घातल्या होत्या. हरदीपसिंग हा ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता. त्याच्या डोक्यावर भारताने दहा लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. कॅनडाने निज्जर हा कॅनडाचा नागरिक होता, अशी भूमिका घेतली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी सोमवारी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’समोर भूमिका मांडली, त्यात ते म्हणाले, ‘हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणा काही आठवड्यांपासून तपास करीत आहेत. या प्रकरणात भारत सरकारच्या एजंटचा हात असल्याचा आरोप होता आणि या आरोपांची खातरजमा करण्यासाठी तपास करण्यात येत आहे.’ ट्रुडो यांच्या या विधानानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी परराष्ट्रमंत्री मेलनी जॉली यांनी भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला परत पाठविण्याचा आदेश दिला. भारताच्या कॅनडातील गुप्तचर विभागाचे प्रमुख पवनकुमार राय असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरून मॅक्‌के यांना बोलावून घेतले आणि राजनैतिक अधिकारी ऑलिव्हर सिल्वेस्टर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांना सांगितले.कॅनडातील हिंसाचाराच्या कृत्यामध्ये भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप असमंजस आणि हेतूपुरस्सर आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी आपल्या पंतप्रधानासमोरही हा आरोप केला होता आणि आपण तो पूर्णपणे फेटाळला आहे. भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, कायद्याच्या राज्याविषयीची आमची कटिबद्धता कायम आहे.- परराष्ट्र मंत्रालयाची भूमिकाट्रुडो यांचा थयथयाट:भारतावर बेलगाम आरोप करताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले, ‘कॅनडाच्या जमिनीवर आमच्या नागरिकाची हत्येमध्ये एखाद्या देशाच्या सरकारने सहभागी असणे हा देशाच्या सार्वभौमतेचा भंग आहे. अशा प्रकारे देशाच्या सार्वभौमतेचा भंग करणे स्वीकारार्ह नाही.’कोण होता हरदीपसिंग निज्जर:– हरदीपसिंग निज्जर हा ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या दहशतवादी संघटनेचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या होता.- हरदीपसिंग कॅनडाचा नागरिक होता आणि अनेक गुन्ह्यांमध्ये तो तपास यंत्रणांना हवा होता.- लुधियानामध्ये २००७मध्ये झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि ४२ जण जखमी झाले होते. या प्रकरणातही हरदीपसिंगचा हात होता.- भारताने २०२०मध्ये हरदीपसिंगला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. इंटरपोलने २०१६मध्ये त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती.- हरदीपसिंगच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अनेक वेळा प्रयत्न केले होते.- दहशतवादी कारवायांमधील सहभागासाठी कॅनडा पोलिसांनी २०१८मध्ये काही काळासाठी त्याला नजरकैदेत ठेवले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *