उद्योगजगत:सर्वोच्च न्यायालयाचे बनावट वॉरंट पाठवून वर्धमान ग्रुपच्या अध्यक्षांना 7 कोटींचा गंडा

सुप्रसिद्ध वस्त्रोद्योग वर्धमान ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी एसपी ओसवाल यांना ७ कोटी रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे बनावट वॉरंट दाखवून पाच राज्यांतील ९ सायबर ठगांनी ओसवाल यांना समूहाची मालमत्ता जप्त करण्याची आणि त्यांची बदनामी हाेईल, असे धमकावले. या प्रकरणी ओसवाल यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी २ आरोपींना अटक करून ५.२५ कोटी रुपये जप्त केले आहेत. ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी रोख वसुली मानली जात आहे. सायबर क्राइम स्टेशनचे एसएचओ जतिंदर सिंह यांनी सांगितले की, ३१ ऑगस्टला ८२ वर्षीय पद्मभूषण एसपी ओसवाल यांनी तक्रार दिली होती. त्यावरून आरोपीच्या ठिकाणावरून पोलिस आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले. तीन दिवसांच्या छाप्यानंतर पोलिसांनी गुवाहाटी येथील अतनू चौधरी आणि आनंद चौधरी यांना अटक केली. आतापर्यंतच्या तपासात हे ९ जणांचे काम असल्याचे समोर आले आहे. या टोळीने सीबीआय अधिकारी असल्याचे दाखवून फसवणूक केल्याचे पोलिस आयुक्त कुलदीप चहल यांनी सांगितले. यातील दोघांना पकडले असून लवकरच इतरांनाही अटक करण्यात येईल. फरार आरोपी आसाम, पश्चिम बंगाल, दिल्ली येथे लपून बसले आहेत. रुमी ही या टोळीची म्होरक्या आहे. सर्व आरोपी कायद्याची आणि सरकारी यंत्रणांचे जाणकार आहेत. अस्खलित इंग्रजी बोलतात. वर्धमान ग्रुपच्या अध्यक्षांनी पोलिसांना काय सांगितले… १. ठगाने कॉल केला, अटक वॉरंट आणि मालमत्ता सील करू असे म्हटले:
तक्रारीत एसपी ओसवाल यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाइलवर कॉल आला. आरोपीने सांगितले, तो दिल्लीचा आहे. त्यांच्या नावावर सर्वोच्च न्यायालयाचे अटक वॉरंट आहे. त्यांची मालमत्ता सील करण्याचे आदेश आहेत. तसेच ईडी, सीबीआय, कस्टम विभागाचा हवाला दिला. एक दिवस व्हिडिओ कॉल केला. आरोपी इंग्रजीत बोलत होता. तो सुशिक्षित आहे असे वाटले. वर्धमान ग्रुप आणि त्यांचे नाव वारंवार घेत होता.
कापड उद्योग त्यांना बिल गेट्स मानतात… : वर्धमान ग्रुपची स्पिनिंग आणि टेक्सटाइल उद्योगात वेगळी ओळख आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे. स्पिनिंग मिल उद्योजक एसपी ओसवाल यांना आपला आदर्श मानतात. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि दूरदृष्टीमुळे उद्योगजगत त्यांची बिल गेट्स यांच्याशी तुलना करते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment