नागपूर : जसप्रीत बुमराह हा संघात असूनही त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात खेळण्याची संधी दिली नव्हती. या गोष्टीचा फटका भारतीय संघाला बसला होता. कारण या सामन्यात भारतीय गोलंदाजीने घात केला होता. पण आता बुमरा दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात खेळणार की नाही, याबाबत भारतीय क्रिकेटपटूने स्पष्ट उत्तर दिले आहे.

बुमराहच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला टी-२०मध्ये २०९ धावाही राखता आल्या नाहीत. प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाने मोहाली लढतीत हे आव्हान अगदी सहज चार चेंडू राखून पार केले. ज्यामुळे पाहुण्यांना तीन लढतींच्या मालिकेत १-० आघाडी मिळाली आहे. अक्षर पटेलचा अपवाद वगळता भारताच्या सगळ्या गोलंदाजांनी अकरापेक्षा जास्त सरासरीने धावा दिल्या.

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर पुनरागमनासाठी कोणतेही दडपण आणले जाणार नाही. त्याला दुखापतीतून सावरत संघातील अंतिम अकरामध्ये परतण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे ते भारताचा ‘स्टार’ अष्टपैलू हार्दिक पंड्याने. जायबंदी बुमराह संघाबाहेर असण्याचा मोठा फटका भारताला नुकत्याच आटोपलेल्या आशिया कप टी-२० स्पर्धेदरम्यान बसला होता. आता तो संघात परतला आहे, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२०मध्ये त्याला लगेच अंतिम अकरामध्ये संधी देण्यात आली नाही. त्याच पार्श्वभूमीवर हार्दिकने संघव्यवस्थापनाचा दृष्टिकोन स्पष्ट केला.

पाठदुखीमुळे बुमराहला आशिया कपदरम्यान विश्रांती देण्यात आली होती. आता ऑस्ट्रेलिया तसेच द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी बुमराह भारतीय संघात परतला आहे. ‘संघातील बुमराहचे महत्त्व आपण सगळेच जाणतो. होय सध्या भारताची गोलंदाजी चिंतेची बाब ठरते आहे, पण बघू… यावरही उपाय काढता येईल. आम्हाला गोलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे. सध्या संघात देशातील सर्वोत्तम १५ खेळाडूंचा समावेश आहे. सर्वोत्तम आहोत, म्हणूनच संघात आहोत’, असे सांगत हार्दिकने गोलंदाजांची पडती बाजू सावरून घेतली.

यंदाच्या आयपीएलपासून हार्दिक पंड्या फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याने ३० चेंडूंत नाबाद ७१ धावांची खेळी करत भारताला द्विशतकी मजल मारून दिली. ‘होय अलीकडे माझी कामगिरी छान होते आहे, पण मी कायमच चांगली कामगिरी आणखी चांगली कशी होईल, याचा विचार करत असतो. आतापर्यंतची माझी वाटचाल, यश-अपयश याचा मी खूप विचार नाही केला. मंगळवारच्या लढतीसाठी मी एक ध्येय समोर ठेवले होते. जे साध्य केले. आता पुढील सामन्यासाठी त्यापुढे एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न असेल’, असे पंड्या सांगतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.