मुंबई: ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारे आणि आता राज्याच्या राजकारणात स्थिरावलेले डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe Birthday) आज ४२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनता आणि चाहते यांच्याशी ते नेहमी जोडलेले असतात. मात्र एके दिवशी कोल्हे यांनी सोशल मीडियावरच एक व्हिडिओ पोस्ट करत इंडस्ट्रीतील एका दिग्दर्शकाविषयी नाराजी व्यक्त केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारीत चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दिग्दर्शक दिग्पाल लांजेरकरांविरोधात ही नाराजी होती. यानंतर दिग्पाल यांनी कोल्हेंची माफीही मागितली होती.

‘शेर शिवराज’ हा दिग्पाल यांचा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आलेली. याच पोस्टवर कोल्हेंनी आक्षेप नोंदवला होता. त्यांनी एका व्हिडिओद्वारे आपला राग व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘एका दिग्दर्शकाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यात त्यांचा हेतू सिनेमाचं प्रमोशन करणं हा असेल. पण माझा त्या कलाकृतीशी कोणताही संबंध नसताना अप्रक्षरित्या त्या पोस्टमध्ये माझं नाव घेण्यात आलं. हा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आला म्हणून मी पोस्ट करणं मला गरजेचं वाटतं. अनेकदा अशा गोष्टींकडे कानाडोळा केला पाहिजे पण वारंवार जेव्हा एक गोष्ट घडते तेव्हा ते खोटे आरोपही खरे वाटू लागतात.’

हे वाचा-द कश्मीर फाईल्सला मागे टाकणार ‘ब्रह्मास्त्र’? पुन्हा वाढली बॉक्स ऑफिसची कमाई

हा व्हिडिओ शेअर करताना अमोल कोल्हे यांनी अशी कॅप्शन दिली होती की, ‘आजवर प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना मी कायमच त्या थोर व्यक्तिरेखांना नतमस्तक होत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मान ठेवून इतरांच्या सादरीकरणावर कधीही भाष्य केले नाही उलट कौतुकच केले. असे असताना ‘अशा’ प्रकारची पोस्ट लिहिणाऱ्यांचे व ती शेअर करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!’


दिग्पाल लांजेकरांच्या अकाउंटवरुन करण्यात आलेली पोस्ट काय होती?

दिग्पाल यांच्या फेसबुकवर ‘शेर शिवराज’ सिनेमाचं कौतुक करणारी एक पोस्ट करण्यात आली. ज्यामध्ये या सिनेमाविषयी काही मुद्दे मांडण्यात आले होते. त्यापैकी तिसऱ्या-चौथ्या मुद्द्यामध्ये अप्रत्यक्षरित्या कोल्हेंवर टीका करण्यात आली होती. हा मुद्दा असा होता की, ‘टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकरांचा जबरदस्त अभिनय असलेला सिनेमा’. नेमकी ही पोस्ट कोल्हे यांनी पाहिल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केलयाच मुद्द्यावर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला.

हे वाचा-वडिलांचं निधन आणि उद्ध्वस्त झालं कुटुंब; १९८४ च्या दंगलीत अभिनेत्रीने गमावलं सर्वकाही!

लांजेकरांनी मागितली माफी

डॉ. अमोल कोल्हेंचा हा व्हिडिओ जेव्हा दिग्पाल लांजेकर यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी माफी मागितलेली. ‘मनापासून दिलगिरी.. क्षमस्व’, असं म्हणत दिग्पाल यांनीही व्हिडिओ शेअर केला होता. यात दिग्पाल म्हणाले की, ‘खासदार अमोल कोल्हे यांची एक पोस्ट मी पाहिली. माझ्या फेसबुक पोस्टवर त्यांनी आपलं मत मांडलं. ही पोस्ट माझ्या एका चाहत्याने केली होती. अनेक चाहते शेर शिवराजच्या प्रदर्शनानंतर पोस्ट शेअर करत होते, टॅग करत होते. यात अनावधानाने सोशल मीडिया टीमकडून ही पोस्ट शेअर केली गेली. पण जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा काही मिनिटांत ही पोस्ट उडवली गेली. पण याचा स्क्रीनशॉट कोणी काढला असेल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलवला असेल.’

‘मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तम भूमिका साकारणाऱ्या इतक्या मोठ्या कलाकाराबद्दल माझ्या मनात कोणताही आकस नाही. तसेच कोणत्याही प्रकारे त्यांचा अशाप्रकारे अनादर करण्याची माझी कधीच भूमिका नसेल. हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं नाही. पण तरीसुद्धा मी त्यांची माफी मागतो.’ सोशल मीडियावर या दोन्ही कलाकारांचे हे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.