झाशीत 10 नवजातांचा मृत्यू:माणुसकीला काळिमा, यंत्रणेची बेपर्वाई, जखमेवर टाकला ‘चुना’
झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधील शुक्रवारच्या दुर्घटनेनंतर पीडितांनी सरकार आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपले बाळ गमावलेली एक आई म्हणाली, डॉक्टर-नर्सेसनी बाळांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. ते मागच्या दाराने पळून गेले. बाळ आमच्याकडे असते तर स्वत: जळून बाळाला वाचवले असते. दुसरीकडे ७ नवजातांचे प्राण वाचवणारे कृपारामसारखे लोकही होते. परंतु ते स्वत:चे अपत्य वाचवू शकले नाहीत. या आगीच्या दुर्घटनेत १० बाळे दगावली तर ३९ नवजातांचे वाचवण्यात यश आले. यापैकी १६ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक दुपारी रुग्णालयात पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी कर्मचारी रस्त्यावर चुन्याचे पट्टे मारताना दिसून आले. स्वच्छताही केली. फेब्रुवारीत फायर ऑडिट व जूनमध्ये मॉक ड्रिल झाले होते, असा दावा पाठक यांनी केला.तथापि, रुग्णालयात मुदतबाह्य अग्निशमन यंत्र आढळले, तर एनआयसीयूमधील सेफ्टी अलार्म धूर निघाल्यानंतरही वाजला नाही. त्यामुळे बचावकार्यही उशिरा सुरू झाले होते. चाैकशी समिती स्थापन, ७ दिवसांत अहवाल देणार उत्तर प्रदेश सरकारने ४ सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून ती ७ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिस्तरीय तपासाचे आदेश दिले आहेत. अशी लागली आग एक महिला एनआयसीयूमध्ये बाळाला स्तनपान करत होती.त्या वेळी ऑक्सिजन कॉन्सट्रेटरमध्ये आग लागल्याचे तिने पाहिले. क्षणार्धात आगीने इनक्युबेटरला वेढले. त्यानंतर भडका उडाला. ती आपल्या बाळास घेऊन आरडाओरड करीत बाहेर पळाली. प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार ऑक्सिजन पाइप लावण्यासाठी आगपेटीतील काडी लावताच आग लागली. जे बाळ हाती लागेल ते नेले नवजातांच्या हातावर आईच्या नावाची चिठ्ठी लावतात. गोंधळात अनेक बाळांच्या हाताची चिठ्ठी गळाली. त्यामुळे नातेवाइकांनी जे बाळ मिळाले ते नेले. १५ वर्षांत ६६० दुर्घटना; मुख्य कारण – शॉर्टसर्किट हेच देशात रुग्णालयांत गेल्या १५ वर्षांत आगीच्या ६६० दुर्घटना घडल्या. त्यात २०० नवजात किंवा इतरांनी प्राण गमावले. गेल्या ५० वर्षांत आग लागण्याच्या प्रमुख कारणांत शॉर्टसर्किट हेच आहे. प्रारंभिक तपासानुसार झाशीच्या कॉलेजमध्ये ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरमध्ये शॉर्टसर्किटने आग लागल्याचे म्हटले आहे. मग नॅशनल नियोनेटल फोरमच्या (एनएनएफ) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होते की नाही? आक्रोश: नवजातांना तिथे सोडून डॉक्टर पळाले आगीच्या घटनेनंतर देशात नेहमीच फायर सेफ्टी ऑडिटबद्दल बोलले जाते, परंतु प्रत्यक्षात त्यातून धडा घेतला जात नाही
सरकारी रुग्णालयात एनएनएफ दर दोन वर्षांत आणि वेळोवेळी ॲक्रिडेशन इन्स्पेक्शन करते. झाशी मेडिकल कॉलेजमधील त्रुटींबद्दल अहवाल दिला गेला होता का, की त्रुटी दूर केल्या होत्या?
प्रोटोकॉल नुसार रुग्णालयातील आग विझविण्यासाठी ऑक्सिजन युनिटला तत्काळ बंद करावे लागते. झाशीमध्ये आगीचा फैलाव पाहता ऑक्सिजन विभाग बंद करण्यात आला होता का, हा प्रश्न आहे.