म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः कुलाबा, कफ परेडच्या मच्छिमार नगर झोपडपट्टीतील आठ बाय सहाचे घर, चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण नाही, घरची आर्थिक स्थिती बेताची, आई चार घरची धुणीभांडी करणारी… घरात कलासक्त वातावरण नसले तरी सृजनशीलता आणि प्रतिभेचा सहवास या घराला लाभला आहे. या घरातील निलेश मोहिते याची चित्रकला आता थेट ‘ताजमहाल पॅलेस’ हॉटेलमध्ये जाऊन पोहोचणार आहे. येत्या २४ सप्टेंबरला प्रसिद्ध उद्योगपती दस्तुरखुद्द रतन टाटा यांच्या हस्ते निलेशच्या पहिल्यावहिल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

निलेश मोहिते उर्फ सोनू (३२) हा फक्त नववीपर्यंत शिकला असून, लहानपणापासून त्याला चित्रकलेची आवड आहे. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईने इतरांची धुणीभांडी करून निलेश आणि त्याच्या बहिणीचे पालनपोषण केले. आईला ही कामे करावी लागू नयेत म्हणून निलेशने रात्रशाळेसोबतच वेगवेगळ्या ठिकाणी अर्धवेळ नोकरी करून आपला चित्रकलेचा छंदही जोपासला. त्यातूनच त्याची चित्रे विकली जाऊ शकतात आणि त्यातून त्याचा उदरनिर्वाह बऱ्यापैकी चालू शकतो याची जाणीव त्याला झाली आणि हे प्रदर्शनाचे दालन खुले झाले. २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे.

टाटांनी दिलेला धनादेश नाकारला… टाटांनी शब्द राखला

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे निलेशचे आदर्श. त्यांना भेटण्यासाठी जवळपास वर्षभर तो ताज हॉटेलच्या प्रवेशद्वारावर उभा रहायचा. अखेर एक दिवस रतन टाटा यांनी त्याला पाहिले आणि बोलावून घेतले. रतन टाटा यांचे विमानात चढतानाचे एक चित्र निलेशने तयार करून ते टाटा यांना भेट दिले. टाटा यांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांचे एक चित्र काढून तो त्यांना भेट देत असे. निलेशची कला पाहून टाटा प्रभावित झाले. निलेशशी बोलताना त्याची बिकट परिस्थिती टाटा यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला मोठ्या रकमेचा धनादेश देऊ केला आणि ‘या पैशातून मोठे घर घे,’ असे टाटा म्हणाले. भेटवस्तू म्हणून दिलेल्या चित्रांचे पैसे घेणे निलेशला मान्य नव्हते; त्याने तो धनादेश नम्रपणे नाकारला. त्याची नम्रता पाहून टाटांनी त्याला विचारले ‘मग तुझ्यासाठी मी काय करू शकतो?’ त्यावर निलेशने चित्रप्रदर्शनासाठी जागा देण्याची आणि तुम्ही त्या प्रदर्शनाला भेट द्यावी, अशी मागणी केली. टाटा यांनी ही मागणी लगेच मान्य केली.

निलेश अमूर्त, आधुनिक, निसर्ग, पोर्टेट यासह विविध प्रकारची चित्र काढतो. चित्रकलेत पाय रोवत असतानाच्या कठीण काळात निलेशची जनता दलाच्या (सेक्युलर) मुंबई महासचिव ज्योती बडेकर यांच्याशी भेट झाली. बडेकर यांनी आपला आत्मविशास वाढवला. लोकांशी संपर्क कसा करावा, संवाद कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. ताजमहाल पॅलेसमध्ये प्रदर्शन निश्चित झाल्यावर चित्र काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू विकत घेण्याच्या खर्चाची तजवीज बडेकर यांनी करून दिली. उद्योगपती मर्जी पारख यांनीही अमूल्य मदत केल्याचे निलेशने सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.