आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत घुसला पोलिस:आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मीक कराडवर वॉच ठेवा, जितेंद्र आव्हाड यांचा संताप
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असताना अचानक पोलिस घुसल्याने आव्हाड यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मीक कराडवर वॉच ठेवा, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असताना ठाण्याचे एसबी (विशेष शाखा) पोलिस आले तसेच त्यांनी या पत्रकार परिषदेचे चित्रीकरण देखील केले आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी त्या पोलिस कर्मचाऱ्याला चांगलेच सुनावले आहे. तुम्हाला माझ्या घरात यायचा अधिकार कोणी दिला? असा सवाल आव्हाड यांनी त्यांना विचारला आहे. जितेंद्र आव्हाड त्या पोलिस कर्मचाऱ्याला बोलताना म्हणाले, हे माझे घर आहे, माझ्या घरात कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही घ्यायचे हा सर्वस्वी माझा अधिकार आहे. तुम्ही कसे काय आले? वरिष्ठांनी पाठवले म्हणून तुम्ही सरळ येणार का? एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षाच्या एका आमदाराच्या थेट घरात जाऊन शूटिंग करता तुम्ही. तुम्हाला शूटिंग करण्याचा काय अधिकार आहे? माझे घर आहे हे, आधी मला विचारायचं नाहीतर माझ्या पोलिसांना विचारायाचं, आमची प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना विचारला आहे. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, एक पोलिस घरात पकडला जातो. विरोधी पक्षाला जगू द्यायचे आहे की नाही की त्यांना असे कोंबायचे आहे का? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. एवढा वॉच ठेवायचा आहे तर वाल्मीक कराडवर ठेवायचा असता न मर्डर झाल्यानंतर. तेवढेच लवकर पकडला गेला असता, पोलिसांची लाज तरी राहिली असती.