खर्गेंच्या शहांवरील टीकेवर संजय निरुपमांचा घणाघात:म्हणाले – हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून काँग्रेस काय साध्य करू इच्छिते?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाकुंभमध्ये प्रयागराज येथे गंगेत स्नान केले. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमित शहांवर टीका केली होती. गंगेत डुबकी मारून गरिबी हटेल का? असा सवाल खर्गे यांनी केला होता. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या टीकेवर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेस त्यांच्या अध्यक्षांच्या निर्लज्जपणाशी सहमत आहे का? महाकुंभाला सार्वजनिक विरोध हे काँग्रेसचे अधिकृत धोरण आहे का? असा सवाल करत संजय निरुपम यांनी मल्लिकार्जुन खर्गेंच्या टीकेचा समाचार घेतला. तसेच पंडित जवाहरलाल नेहरुंनीही कुंभात स्थान केले, असेही ते म्हणाले. मल्लिकार्जुन खर्गे यांनी मध्य प्रदेशातील महू येथील जय भीम, जय बापू, जय संविधान रॅलीला संबोधित करताना भाजप नेत्यांच्या महाकुंभ स्नानाबाबत वादग्रस्त विधान केले होते. शंभर जन्म घेतले तरी स्वर्गात स्थान मिळणार नाही, गंगेत डुबकी मारून गरिबी हटेल का? असेही ते म्हणाले होते. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या टीकेमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानावरून संजय निरुपम यांनी काही प्रश्न विचारून काँग्रेसचा समाचार घेतला. काय म्हणाले संजय निरुपम?
काँग्रेसने प्रयागराजमधील महाकुंभाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वावर निर्लज्जपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, जिथे आतापर्यंत 13 कोटी लोकांनी पवित्र स्नान केले आहे. हे धाडस कोणत्याही कार्यकर्त्याने केले नाही तर स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. कुंभ स्नान करून गरिबी संपेल का? असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला आहे. एका सभेत व्यासपीठावर राहुल गांधी उपस्थित असताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा सवाल केला आहे. खर्गेजी हे नास्तिक आणि मुळात सनातन विरोधी असल्याची टीकाही संजय निरुपम यांनी केली. संजय निरुपम यांनी काँग्रेसलाही काही प्रश्न विचारले. नेमके काय म्हणाले होते मल्लिकार्जुन खर्गे?
मोदी-शाह यांनी एकत्रितपणे खूप पाप केली आहेत. त्यामुळे पुढील 100 जन्म घेतले ते स्वर्गात जाणार नाही. लोकांकडून मिळणाऱ्या शापामुळे नरकात जातील, असा घणाघात खर्गे यांनी केला होता. तसेच गंगेत डुबकी मारून गरिबी हटेल का? असा सवालही त्यांनी केला होता. त्यांच्या या टीकेनंतर भाजपकडून त्यांच्या चांगलाच समाचार घेतला जात आहे.