कोलकाता: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतानं विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. सलग ८ सामने जिंकत भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारताचे ८ सामन्यांनंतर १६ गुण झाले आहेत. भारताचं अव्वल स्थान अढळ राहणार असल्याचं निश्चित झालं आहे. दक्षिण आफ्रिकेचा तब्बल २४३ धावांनी पराभव करत भारतानं आठवा विजय नोंदवला. विराट कोहलीनं ४९ वं एकदिवसीय शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी केला. यानंतर सगळ्यांनीच विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव झाला. आजी माजी क्रिकेटपटूंनी त्याचं अभिनंदन केलं.संपूर्ण जग कोहलीचं कौतुक करत असताना श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसनं मनाचा कोतेपणा दाखवला. पत्रकार परिषद घेत असताना त्याला विराट कोहलीच्या शतकाबद्दल विचारण्यात आलं. मेंडिसनं त्यावर भाष्य करताना कोहलीचं अभिनंदन करण्यास नकार दिला. त्याच्या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. मेंडिसच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.कोहलीनं ४९वं शतक साजरं केल्यानंतर एका पत्रकारानं कुसल मेंडिसला प्रतिक्रिया विचारली. कोहलीच्या शतकाबद्दल त्याचं अभिनंदन करु इच्छिता का, असा प्रश्न पत्रकारानं विचारला. त्यावर मी त्याचं अभिनंदन करु, असा उलट प्रश्न मेंडिसनं केला. मेंडिसच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेंडिसच्या विधानाबद्दल कोहलीच्या चाहत्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. बऱ्याच चाहत्यांनी मेंडिसच्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला.कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १०१ धावांची खेळी साकारली. कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत ३२६ धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ढेपाळले. रविंद्र जाडेजाच्या फिरकीसमोर आफ्रिकन फलंदाजांनी नांगी टाकली. जाडेजानं निम्मा संघ तंबूत धाडला. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी यांनीदेखील सुरेख मारा केला. सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमी ४९ शतकांची बरोबरी करण्याची संधी कोहलीनं वर्ल्डकपमध्ये दोनदा गमावली. न्यूझीलंडविरुद्ध तो ९५ धावांवर बाद झाला, तर श्रीलंकेविरुद्ध त्याला ८८ धावा करता आल्या. अखेर आफ्रिकेविरुद्ध त्यानं शतक झळकावलं. कोहलीनं ४९ वं शतक झळकावल्यानंतर सचिननं त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं. ५० वं शतक लवकर व्हावं यासाठी सचिननं त्याला शुभेच्छा दिल्या.