कोलकाता अत्याचार प्रकरण:मुलीचा मृतदेह घरात होता अन् डीसीपी तोंड बंद करण्यासाठी मला पैसे देत होते- वडील
पश्चिम बंगालच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार व हत्या प्रकरणात कोलकाता पोलिसांवर आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मृत डॉक्टरच्या वडिलांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, १० ऑगस्ट रोजी मुलीचा मृतदेह घरात ठेवला होता तेव्हा कोलकाता पोलिस दलातील एका उपायुक्ताने (डीसीपी) मला तोंड बंद पैसे ऑफर केले होते. त्यांची ऑफर ऐकून मी चकित झालो. मी मुलीच्या दु:खात असल्याने त्या वेळी उत्तर देऊ शकलो नाही आणि रडतच त्यांची ऑफर नाकारली. तथापि, आता मी त्या अधिकाऱ्याचे नाव सीबीआयला दिले आहे. किती पैसे ऑफर केले असे दिव्य मराठीने विचारले असता ते म्हणाले, पैसे एका पांढऱ्या पाकिटात होते. माझा प्रश्न हा आहे की, पोलिस पैसे का देऊ इच्छित होते? याचे उत्तर ममता बॅनर्जी यांनी द्यावे. अंत्यसंस्कारापूर्वी माझ्याकडून कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. मात्र, मी तो कागद फाडून टाकला. ३ प्रश्न, जे कोलकाता पोलिसांवर संशय वाढवत आहेत… 1. मृताची आई म्हणाली, मुलीने सेमिनार हॉलमध्ये ४ सहकाऱ्यांसह रात्री ११:३० वाजता जेवण केल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले. मग टीव्हीवर ऑलिम्पिकमधील नीरज चोप्राचा सामना पाहिला. मात्र, तिला खेळ आवडत नाहीत. ती रात्री जेवणानंतर माझ्याशी उशिरापर्यंत बोलत असे. 2. घटना ९ ऑगस्टच्या रात्रीची. १० ऑगस्ट सायं. ६ ते ७ वाजेदरम्यान टाला ठाण्यात तक्रार दिली, पण रात्री ११:४५ वा. गुन्हा का दाखल केला?
3. पोलिसांनी घाईत अंत्यसंस्कार का केले? माझ्याकडून अंत्यसंस्काराचा खर्चही का घेतला नाही?
मृत महिला डॉक्टरसाठी गुरुवारीही कोलकात्यात आंदोलन सुरू होते.
तपासाचे अपडेट… घोषनेच दिली होती तोडफोडीची परवानगी १. घटनेच्या रात्री २:०३ वाजता मृत डॉक्टरच्या एका नातेवाइकाच्या व्हॉट्सॲपवर एका कनिष्ठ डॉक्टरच्या फोनवरून मेसेज पाठवण्यात आला होता. दिशाभूल करण्यासाठी तर असे केले नाही ना, याचा शोध सीबीआय घेत आहे. कारण मृत डॉक्टरचा फोन तिच्या बोटाच्या ठशानेच उघडत होता.
२. घटनेच्या दुसऱ्या दिवशी कनिष्ठ डॉक्टरांच्या मागणीवरून सेमिनार रूमला लागलेले कॅमेरे व बाथरूम तोडण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याचे आदेश माजी प्राचार्य संदीप घोषने दिले होते. बिहारमध्ये निडर नारी प्रकल्प : महिलांनी ११२ वर कॉल करावा, पोलिस सोबत राहतील बिहार पोलिसांनी ६ जिल्ह्यांत निडर नारी प्रकल्प सुरू केला आहे. यात पाटणा, नालंदा, गया, भागलपूर, बेगूसराय आणि मुजफ्फरपूर येथे महिलांना २४ तास नि:शुल्क सुरक्षा सेवा मिळेल. डीजीपी अलोक राज म्हणाले, घरातून बाहेर पडल्यानंतर महिलांनी डायल ११२ वर कॉल केल्यास त्यांना एक सीक्रेट कोड दिला जाईल. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर दर १५ मिनिटांत डायल ११२ चे पथक महिलेच्या सुरक्षेचा आढावा घेत राहील. हे पथक महिलांना डिजिटली ट्रॅक करत राहील. चाचणी यशस्वी झाल्यास १५ सप्टेंबरपासून राज्यात प्रकल्प लागू केला जाईल.