कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी:चार दिवसांनंतरही मृतांची यादी जाहीर नाहीच; संख्येबाबत शंका, प्रशासन म्हणते 30 मृत्यू, राज्यांचा आकडा 44

कुंभमेळ्यात मौनी अमावास्येला झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांबाबत रोज नवे गौप्यस्फोट होत आहेत. प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या राज्यांनी दिलेली आकडेवारी लक्षात घेता मृतांची संख्या ४४ पर्यंत होते. पण कुंभ प्रशासन मात्र ३० जणांचाच मृत्यू झाल्याचे सांगत आहे. मात्र अजून त्यांनी मृतांची यादी जाहीर केलेली नाही. इतरांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणाने झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मेळा अधिकारी विजय किरण म्हणाले, ९० जण जखमी झाले, ३० पैकी २५ मृतांची ओळख पटली. मृतांमध्ये बिहारचे ११, प्रत्येकी २ लाखांची मदत मौनी अमावास्येनंतर प्रयागराजमधून वेगवेगळ्या राज्यात ४१ मृतदेह पाठवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील ८ जिल्ह्यांत १६, बिहारमध्ये ८, कर्नाटकात ४, हरियाणा-राजस्थानमध्ये प्रत्येकी ३, झारखंड व बंगालमध्ये २-२, आसाम, गुजरात, उत्तरखंडमध्ये प्रत्येकी १ मृतदेह पाठवला. पण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मात्र त्या राज्यातील ११ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगून त्यांच्या वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर केली. उपराष्ट्रपतींचे संगम स्नान उपराष्ट्रपती जगदीप धनखड व त्यांच्या पत्नी सुदेश यांनी शनिवारी संगमावर स्नान केले.‘ पृथ्वीवर आजपर्यंत इतक्या कोटी लोकांचा संगम कधी झाला नाही. प्रशासनाचे काम अद्भुत आहे.’ दरम्यान, ७७ देशांतील राजदूतही कुटुंबीयांसह कुंभमेळ्यात आले होते. तिसऱ्या दुर्घटनेत ५ ठार मौनी अमावास्येच्या रात्री संगम तीर, झुंसी सेक्टर २१ याशिवाय जुन्या जीटी रोडवर मुक्ती मार्गजवळही चेंगराचेंगरी झाली. एका गाडीने ३ महिलांना चिरडल्यानंतर पळापळ होऊन चेंगराचेंगरीत ५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.