जिद्द:स्वावलंबी मुली बनवताहेत एलईडी अन् सोलार लाइट्स; सरकारी कार्यालयांत लागणार दिवे
गावात विजेची मोठी कपात व्हायची. सायंकाळ होताच प्रकाशासाठी कंदिलाचाच आधार होता. सौरऊर्जेद्वारे प्रकाश देण्याचा विचार केला. व्होकेशनल कोर्समधील प्रशिक्षण कामी आले. संसाधने जुळवली व सोलर ट्री आणि लाइट बनवले. कौशल्यातून स्वावलंबी होण्याची ही कथा आहे झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातील दांतू गावच्या मुली राणी, उषा, अपर्णा, पूजा, दीपिका आणि प्रीतीची. दांतू प्लस टू हायस्कूलच्या या माजी विद्यार्थिनींनी १५०० पेक्षा अधिक सोलार लाइट, ६००० हून अधिक एलईडी बल्ब, ट्यूबलाइट बनवले. झारखंडसह बिहार व ओडिशातही पुरवठा होतो. या मुलींच्या बल्बनी सरकारी कार्यालय प्रकाशमान करण्याची योजना आहे. त्यांची प्रेरणादायी कथा यूएन वुमन इंडिया मासिकात ‘हम : व्हेन वुमन लीड’ नावाने समाविष्ट केली आहे.
सर्व सहा जणी करताहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग राणी व तिच्या टीममधील सर्व ६ मुली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करत आहेत. अभ्यासातून वेळ मिळेल तेव्हा बल्ब बनवतात. त्यांनी बनवलेले एलईडी बल्ब जिल्हा प्रशासन खरेदी करेल, असे आश्वासन उपायुक्त विजया जाधव यांनी दिले. हेच बल्ब शासकीय कार्यालयात लावले जातील.
शिक्षणासह व्होकेशनल कोर्समुळे मुले होताहेत स्वावलंबी शिक्षक अनिमेश चंद्र सांगतात, दांतू प्लस टू शाळेतील अनेक मुले स्वावलंबी होण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. राणी व तिच्या टीमने या वर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया स्किल्स स्पर्धेत झारखंडचे प्रतिनिधित्व केले आहे. दांतू गावातील सावित्रीकुमारी जेपीएससीची टॉपर ठरली आहे.