इस्लामाबाद: देव देतो तेव्हा घेणाऱ्याची झोळी कमी पडते असं म्हणतात. पाकिस्तानच्या कराची शहरात राहणाऱ्या मच्छिमाराला याचा प्रत्यय आला आहे. मच्छिमाराचं नशीब एका रात्रीत पालटलं. तो रातोरात कोट्यधीश झाला. अरबी समुद्रात सापडलेल्या एका माशामुळे त्याला लॉटरीच लागली.पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, शहरात राहणाऱ्या हाजी बलूच आणि त्यांच्या साथीदारांचं नशीब एका माशामुळे फळफळलं. मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात गोल्डन फिश (सोवा) सापडला. या माशामुळे त्यांचं नशीब पालटलं. हाजी बलूच यांनी माशाचा लिलाव केला. त्यात मासा ७ कोटी रुपयांना विकला गेला.कराचीजवळच्या समुद्रात हाजी आणि त्यांचे साथीदार मासेमारी करत होते. तेव्हा त्यांना बरेचसे गोल्डन फिश दिसले. मासे पकडण्यासाठी त्यांनी जाळ टाकलं. त्यात एक गोल्डन फिश सापडला. हा मासा विकून आलेले पैसे बोटीवर काम करणाऱ्या सात जणांमध्ये वाटणार असल्याचं हाजींनी सांगितलं.सोवा मासा दुर्मीळ मानला जातो. त्यामुळे या माशाला जास्त किंमत मिळते. माशाच्या पोटातून निघणाऱ्या पदार्थांमध्ये औषधी गुणधर्म असतात. माशाच्या पोटात सापडणाऱ्या धाग्यांचा वापर शस्त्रक्रियेत केला जातो. या माशाचं वजन २० ते ४० किलोच्या दरम्यान असतं. त्याची लांबी १.५ मीटरपर्यंत असते. पूर्व आशियातील देशांमध्ये या माशाला विशेष मागणी आहे. सोवा माशाला सांस्कृतिक आणि पारंपारिक महत्त्वदेखील आहे. पारंपारिक औषधं आणि स्थानिक खाद्यपदार्थांमध्ये सोवाचा वापर केला जातो. हा मासा केवळ प्रजानन काळातच किनारी भागात आढळून येतो.