महाराष्ट्रातल्या 187 नवनिर्वाचित आमदारांवर गुन्हे:’एडीआर’चा धक्कादायक अहवाल; 118 MLA वर महिला अत्याचार, खून, भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे दाखल
देशभर गाजलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस अर्थातच एडीआरचा एक धक्कादायक अहवाल आलाय. त्यांनी 288 आमदारांपैकी नवनिर्वाचित 187 आमदारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. ‘एडीआर’ने आमदारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील तपशीलांचा अभ्यास केला. तेव्हा अतिशय भयंकर असे वास्तव समोर आले. विशेष म्हणजे नव्या आमदारांपैकी 118 जणांवर महिलांवर अत्याचार, भ्रष्टाचार, खून, खुनाचा प्रयत्न, निवडणूक संदर्भात गुन्हे दाखल आहेत. एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा जोरात सुरूय. विरोधीपक्ष अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. मात्र, दुसरीकडे आपण निवडून दिलेल्या आमदारांचे प्रताप पाहिले, तर सर्वसामान्य माणूस कोमात गेल्या शिवाय राहणार नाही. भाजपच्या 92 आमदारांवर विविध गुन्हे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निकालात भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला. त्यांचे 132 आमदार निवडून आले. मात्र, यातल्या 92 आमदारांवर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यातही 40 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. शिंदे, दादांचा पक्षही शर्यतीत शिवसेना शिंदे यांचे 57 आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यांच्याही 38 आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सोबतच त्यांच्याही एकूण 47 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार जिंकले. त्यातल्या 20 आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. शिवसेना ठाकरेंच्या 13 आमदारांवर गुन्हे विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 20 आमदार विजयी झालेत. त्यांच्या 13 आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. काँग्रेसचे 16 आमदार विजयी झालेत. त्यांच्या 9 आमदारांवर विविध गु्न्हे दाखल आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार विजयी झालेत. त्यांच्या 5 आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे अहवालात म्हटले आहे. अजित पवारांचे आमदार करोडपती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच आमदार हे करोडपती आहेत. भाजप आणि शिवसेनेचे 98 टक्के आमदार करोडपती असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे साजिद पठाण हे सर्वात गरीब आमदार ठरलेत. त्यांची एकूण मालमत्ता फक्त 9 लाखांची असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर भाजपचे श्याम खोडे यांची मालमत्ता 31 लाख आणि गोपीचंद पडळकर यांची मालमत्ता 65 लाखांची असल्याचे म्हटले आहे. रोहित पाटील सर्वात तरुण आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ हे वयोमानानुसार सर्वात ज्येष्ठ ठरलेत. त्यांचे वय 77 वर्षांचे आहे. त्या खालोखाल दिलीप सोपल (वय 75), गणेश नाईक (वय 74) यांचा नंबर लागतो. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पाटील हे सर्वात तरुण आमदार ठरलेत. त्यांचे वय 25 वर्ष आहे. त्यानंतर भाजपचे करण देवतळे (वय 29), राघवेंद्र पाटील (वय 31) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वरुण देसाई (वय 32) यांचा नंबर लागतो. आमदारांमध्ये एकूण 22 महिला असल्याची नोंदही या अहवालात आहे.