महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर:अंबरनाथ येथे तरुणीची धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या; वांद्रे येथे महिलेवर बलात्कार

राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ठाण्यातील अंबरनाथ पूर्व मध्य रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रिजवर एका तरुणीवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा महिला असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेची अधिक माहिती अशी की, अंबरनाथ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रिजवरून जात असताना एका तरुणीवर हल्लेखोराने दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यानंतर तरुणी जखमी अवस्थेत तिथेच पडली होती. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. संबंधित तरुणी व तिचा मित्र दोघे ब्रिजवरून जात असताना त्यांच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की आरोपी तरुणाने त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने तरुणीवर थेट हल्ला करण्यास सुरू केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली व रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच पडली. मदतकर्त्यांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केले, मात्र बराच उशीर झाला होता आणि त्यात तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपीने हा हल्ला का केला याची माहिती अद्याप समजू शकली नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत सीमा कांबळे आणि आरोपी राहुल भिंगारकर यांचे प्रेमसंबंध होते. सीमा कांबळे ही 35 वर्षांची होती तर राहुल भिंगारकर हा 29 वर्षांचा आहे. सीमाने राहुल भिंगारकरला उसने पैसे दिल्याची माहिती आहे. सीमाने हे पैसे परत कर नाहीतर लग्न कर असा तगादा लावला होता. यातूनच ही हत्या घडल्याचे प्राथमिक तपासात माहिती समोर आली आहे. सीमा कांबळे ही विवाहित असून ती पतीपासून विभक्त राहत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. सीमा आणि राहुल एकाच परिसरात राहत असून यांचे प्रेम संबंध जुळले. नंतर त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारही झाल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली. वांद्रे येथे महिलेवर कुलीने केला बलात्कार अंबरनाथमध्ये तरुणीच्या हत्येची घटना घडली, तर दुसरीकडे मुंबईच्या वांद्रे टर्मिनसमध्ये एका कुलीने रेल्वेच्या रिकाम्या डब्यात एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल अब्दुल शेख असे या आरोपीचे नाव आहे. तसेच तो एक विनापरवाना हमाल असल्याचे समजते. रविवारी, 2 फेब्रुवारी रोजी एक महिला तिच्या मुलासोबत प्रवास करत होती. शनिवारी रात्री तिची ट्रेन वांद्रे टर्मिनस येथे पोहोचली. वांद्रे टर्मिन्समधून तिची दुसऱ्या ठिकाणी जाणारी ट्रेन होती. ही ट्रेन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभी होती. ती महिला त्या ट्रेनमध्ये चढली. त्यावेळी इतर कोणताही प्रवासी या ट्रेनमध्ये नव्हता. त्याचवेळी एक कुली त्या ट्रेनमध्ये चढला. त्या कुलीने आजूबाजूला कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत त्या महिलेवर बलात्कार केला. यानंतर तो पळून गेला. यानंतर त्या महिलेने तात्काळ वांद्रे जीआरपीएफ पोलिसात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याची माहिती मिळताच पहिल्यांदा महिलेला वैद्यकीय मदत देण्यात आली. यानंतर तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले. यादरम्यान रेल्वे पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी अनेक सीसीटीव्हीचे फुटेज तपासले आणि आरोपीला अटक करण्यात आली.