महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर:सुप्रिया सुळेंवर ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज, सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा सूर महाविकास आघाडीमधून निघताना दिसत आहे. तसेच काहींचे मत एकत्रित लढण्याचे आहे. असे दोन्ही मतप्रवाह महाविकास आघाडीमध्ये दिसून येत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. यामुळे महाविकास आघाडीमधील धुसफूस उघड झाली आहे. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांच्या विधानावर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी सारवासारव केल्याचे दिसत आहे. सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे म्हंटले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बारामती, दौंड आणि पुरंदरच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रिया ताईंसाठी छातीचा कोट करुन काम केले. पण कौतुकच नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. खासदार संजय राऊत यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी ही खदखद व्यक्त केली, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इंदापूर, दौंड, पुरंदर आणि बारामतीच्या कार्यकर्त्यांनी कालच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. पण ती नाराजी सुप्रिया ताई यांच्याबद्दलची होती. त्यांचे म्हणणे होते की, निवडणूक काळात आम्ही सुप्रिया ताईंसाठी छातीचा कोट करुन काम केले. मात्र सुप्रिया ताई यांच्याकडून आम्हाला जसा प्रतिसाद हवा तसा मिळत नाही. त्यामुळे आम्ही थोडेसे दुखावले गेले आहोत. त्यावर संजय राऊतांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. मी दिल्लीत संसदेच्या अधिवेशनावेळी सुप्रिया सुळे यांना भेटेन तेव्हा तुमच्या भावना सांगेन. गरज पडल्यास इंदापूर, दौंड, पुरंदर, बारामतीच्या कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक घेऊन नाराजी दूर केली जाईल, अशी ग्वाही संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे. सुषमा अंधारे यांच्या या विधानावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्याकडून काहीही कमतरता झाली असेल तर मी स्वत:हून त्याची नैतिकतेने जबाबदारी घेईन. मी 30 तारखेला मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहे. मी दौंड, इंदापूर आणि बारामतीच्या ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांना फोन करुन त्यांच्या मनातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न करेन. मी दर 15 दिवसांनी मतदारसंघात असते. त्यावेळी मी महाविकास आघाडीची बैठक घेते. एखादा कार्यकर्ता दुखावला गेला असेल तर त्याची नाराजी दूर करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी तातडीने आज आजच्या आज शिवसैनिकांची नाराजी दूर होईल यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करणार आहे. महाविकास आघाडीत कुणाचीही तक्रार येणार नाही, याची स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. ती जबाबदारी मी घेत आहे, अशी सारवासारव करण्याची भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.