माझ्या बहिणीला पुन्हा उपोषण करण्याची वेळ येऊ नये:बनेश्वर रस्त्यासंदर्भात अजित पवारांच्या सूचना; रायगड पालकमंत्री पदाबाबत म्हणाले, ‘जरा धीर धरा, धीरे…धीरे’

माझ्या बहिणीला पुन्हा उपोषण करण्याची वेळ येऊ नये, अशी सक्त ताकीद आपण जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकार्यांना दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भोर तालुक्यातील या रस्त्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची दूरावस्था झाली असून रस्ता करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. यावर आता अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाबाबत देखील अजित पवार यांनी भाष्य केले. हा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र हा तीढा नक्की सुटेल, जरा धीर धरा, अशा शब्दात अजित पवार यांनी या संदर्भात संयमाचा सल्ला दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे, तो लवकरात लवकर करावा ह्या मागणीसह सरकारी अनास्थेचा निषेध करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंकडून धरणे आंदोलन करण्यात आले होते. या संदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, बनेश्वर देवस्थानांकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अजून झालेले नाही हे खूप दुर्दैवी आहे. ज्या शहरामध्ये करोडो रुपयांची मेट्रो होऊ शकते, करोडो रुपयांचे रस्ते नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात होत आहे. नितीन गडकरी यांच्याकडे कधीही कामासंदर्भात गेलो तर ते नाही म्हणत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व टीमच्या पाठपुराव्यांमुळे सर्वच रस्ते झाले आहेत. तसेच हा रस्ता लवकर करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पालकमंत्री पदाचा देखील तीढा सुटेल थोडा धीर धरा, धीरे… धीरे नाशिक आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तीढा सुटलेला नसला तरी त्यावर काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून तिथले जिल्हा नियोजनाचे बजेट दिलेले आहे. निधी दिलेला आहे. या दोन्ही ठिकाणी निधी वाढवण्यात देखील आला आहे. 22 हजार कोटी रुपयांची सगळीकडे तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचा देखील तीढा सुटेल थोडा धीर धरा, धीरे… धीरे, अशा शब्दात अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र याबाबत अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. अमित शहा हे मुंबईत येणार असतील तर त्यांनी माझ्याकडे भोजनासाठी यावे किंवा रायगड परिसरात जाणार असतील तर सुनील तटकरे यांच्याकडे भोजनासाठी यावे, असे आमंत्रण आम्ही त्यांना दिले होते. अमित शहा यांचा दौरा रायगड परिसरात असल्यामुळे ते सुनील तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री तसेच त्या भागातले मंत्री म्हणून गोगावले आणि उदय सामंत यांना देखील निमंत्रण दिले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.