भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. या मालिकेतील पाचवी आणि अंतिम टी-२० मॅच ३ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार होती. आता ही लढत हैदराबाद येथे होणार नाही. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्याच बरोबर मालिकेती चौथी मॅच नागपूर येथे होणार नाही.
तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल. त्याच दिवशी मालिकेतील ५वी लढत होणार आहे. एकाच दिवशी स्थानिक पोलिसांनी दोन मोठ्या घटनांसाठई सुरक्षा देता येणार नाही, याच कारणामुळे मॅच हैदराबादमध्ये न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दुसऱ्या बाजूला विदर्भ क्रिकेट असोसिएशनने नागपूर स्टेडियमवर काम सुरू केले आहे, ज्यामुळे या मैदानावर लढत होणे शक्य नाही.
टी-२० मालिकेतील चौथी आणि पाचवी लढत कुठे होईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार बेंगळुरू हा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. तर चौथ्या मॅचसाठी रायपूरची निवड केली जाऊ शकते. क्रिकबझने या संदर्भात छत्तीसगड क्रिकेट असोसिएशनशी संपर्क करून या वृत्ताला दुजोरा मिळवला आहे.
वर्ल्डकपची फायनलस झाल्यानंतर चार दिवसात ही मालिका सुरू होईल. २३ नोव्हेंबरला पहिली टी-२० मॅच विशाखापट्टनम येथे होईल. २६ तारखेला तिरुवनंतपूरम येथे दुसरी, २८ नोव्हेंबरला गुवाहाटी येथे तिसरी मॅच होईल. तर १ डिसेंबरला चौथी आणि ३ डिसेंबरला पाचवी मॅच होणार आहे.
या मालिकेसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. हार्दिक पंड्याला दुखापत झाल्याने सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाड यांच्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व दिले जाऊ शकते.
Read Latest Sports News And Marathi News