मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत ज्या पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये गेलेत, त्याच प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भातखळकरांच्या पत्रानंतर पवारांची चौकशी होणार का? असा प्रश्न विचारला जात असतानाच आज खुद्द पवारांनीच भाजपचं आव्हान स्वीकारलं आहे. माझ्यावर आरोप केलेत ना, आता लगेच चौकशी करा, मी तर म्हणतो पुढच्या ८ दिवसांत चौकशी लावा पण त्या आरोपांमध्ये जर काही तथ्य नसेल तर आरोप करणाऱ्यांसंबंधी राज्य सरकारची काय भूमिका असेल हे आधी स्पष्ट करा, अशा शब्दात शरद पवार यांनी चौकशीचं आव्हान स्वीकारत भाजपला ललकारलं आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर बोट ठेवत भातखळकरांनी शरद पवार यांचीही याप्रकरणातल्या सहभागाविषयी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटर मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपने केलेले आरोप खोडून काढले. पवारांबरोबर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही होते. त्यांनीही त्यांच्या खास शैलीत आरोप खोडून काढतानाच भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

“पत्राचाळ प्रकरणी शरद पवार यांनी बैठक घेतली यात काही नवल नाही. पवारसाहेबांनी राजकारणात आल्यापासून २०-२२ हजार बैठक घेतल्या असतील. तसेच पवारांनी मध्यस्थी केली नाही असा महाराष्ट्रात एकही प्रकल्प नाही. मला भाजपवाल्यांना सांगायचं आहे की चौकशी करायची असेल तर खुशाल करा पण पराचा कावळा करु नका. पत्राचाळ निर्णय प्रक्रियेत पवारांचा काही संबंध नाही. प्रकल्पांना दिशा देण्याचं काम पवारांनी केलं आहे. पवारांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे”, असं सांगत पत्राचाळीबाबत झालेल्या आरोपांचं जितेंद्र आव्हाड यांनी खंडन केलं.

लगेच चौकशी करा पण……

“माझ्यावर आरोप केलेत ना, आता लगेच चौकशी करा… मी तर म्हणतो पुढच्या ४-८-१० दिवसांत या प्रकरणात माझी चौकशी लावा पण त्या आरोपांमध्ये जर काही तथ्य नसेल तर आरोप करणाऱ्यांसंबंधी राज्य सरकारची काय भूमिका असेल हे आधी स्पष्ट करा”, असं शरद पवार म्हणाले.

भाजपच्या अतुल भातखळकरांकडून पवारांच्या चौकशीची मागणी

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.