मनोज जरांगे पाटलांनी केली उपोषण सोडण्याची घोषणा:आता झकपक आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, आता त्यांनी हे उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा मारेकरी कोण आहे हे आता समोर आले आहे, मराठा समाजाचे डोळे उघडले आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी आता उपोषण करणार नाही. पण आता झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता उपोषण सोडण्याबाबत मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे. आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार, अशी घोषणा त्यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमचे डोळे उघडले आणि मराठा समाजाचे डोळे उघडले आहेत. खऱ्या आरक्षणाचा मारेकरी कोण हे सर्वांना माहित झाले आहे. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून काम करत नाही, हे मराठा समाजाला कळलं आहे. संतोष देशमुखांचा प्रकरण आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. धनंजय देशमुख यांना सकाळी मी बोललो आहे की मी संतोष देशमुखांचे प्रकरण मागे पडू देणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले, एवढे दिवस आम्हाला उपोषण करायची वेळ येईल हे अपेक्षितच नव्हतं. फडणवीस गद्दारी मराठ्यांशी करणार असे आम्हाला वाटत नव्हते. मी उपोषणाला बसलो आणि सिद्ध झाले की देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. मराठा समाजाच्या मागणीची अंमलबजावणी होईल असा आम्हाला वाटत होतं. परंतु लक्षात आले की मराठ्यांना काही द्यायचे नाही. आम्ही सकाळी सांगितले होते फडणवीसांना आमच्या मागण्या मान्य करायचे का नाही, हे बोलले पाहिजे होते. परंतु ते काही बोलले नाही. फडणवीस साहेब, आता आनंद लय दिवस राहणार नाही, आनंदावर विरजन पडेल. ज्या दिवशी बोलायचं त्या दिवशी तुम्हाला सांगे. खरी चूक कोणाची आहे हे मराठा समाजाला कळालं आहे. आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि आम्ही काय आता वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू. बेईमानी आणि गद्दारी फडणवीस यांच्याकडून होईल असे वाटले नव्हते. जे हक्काचे आहे ते आरक्षण देत नाहीत. आम्हाला उपोषण करायचे नव्हते. आम्हाला वाटले, दोन दिवसात मागण्या पूर्ण होतील. फडणवीस यांनी मात्र चुप्पी मारली. मराठाविषयी किती द्वेष आणि आकस आहे दिसून आले. फडणवीस किती मराठा द्वेषी आहेत, ते उघडे पडले. आंदोलन सोडल्यानंतर सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी बोलायला सुरू करेल, तेव्हा तुम्हाला तिन्ही ताळात जागा राहणार नाही. मराठ्यांनी सावध व्हावे, मुला-बाळांचे वाटोळे होऊ देऊ नका. पावणे दोन वर्षे आंदोलन केली. आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहे. मराठा समाज उपोषण करणार नाही, पण आता झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता उपोषण सोडण्याबाबत समाजाशी बोलून निर्णय घेणार आहेत.