मनसेची दहिसर मतदारसंघाच्या मतमोजणीतून माघार:ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप, कार्यकर्त्यांचीही मते मिळाली नसल्याचा दावा
विधानसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू येरूणर यांनी मतमोजणीतून माघार घेतली आहे. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी मतमोजणीच्या 11 फेऱ्यांनंतर माघार घेतली. मनसे कार्यकर्त्यांची देखील मते आपल्याला मिळाली नाहीत, त्यामुळे ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोपही राजू येरूणकर यांनी केला. राजू येरूणकर म्हणाले, स्ट्राँगरुम उघडल्यानंतर एका ईव्हीएम मशीनचे सील तुटलेले होते. याबाबत विचारणा केली असता, आम्ही हाताळत असताना ईव्हीएमचे सिल तुटल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. पण इतर मशीनला सील असताना एका मशीनचे सील तुटणे ही संशयास्पद बाब आहे. त्यामुळे मतमोजणीतून माघार घेत आहोत. आम्हाला पोलिसांकडे देण्याची, तुरुंगात टाकण्याची धमकी निवडणूक अधिकारी देत आहेत, असा आरोपही येरूणकर यांनी केला. हा सगळी गडबड पाहता लोकशाही संपलेली आहे, असेही राजू येरुणकर म्हणाले. कार्यकर्त्यांची देखील मते मिळाली नाहीत
राजू येरूणकर म्हणाले, आमच्या प्रभावाखालील भागात मनसे कार्यकर्त्यांची जितकी मते होती, तितकी देखील आम्हाला मिळाली नाहीत. आम्हाला केवळ पाच मते मिळाली. त्यामुळे ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा संशय आहे, असा आरोप मनसेचे उमेदवार राजू येरूणकर यांनी केला आहे. सगळ्या ईव्हीएम मशीन्सला तीन-तीन सील असतील, तर एकाच मशीनला एक सील कसे असू शकते. असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील पाच वर्षांत पाच मशीन बोगस निघाल्या
ईव्हीएम मशील 99 टक्के चार्ज आहे. मशीन पूर्ण दिवस बुथमध्ये आहे, तर 99 टक्के चार्ज कशी असू शकते, असा सवाल येरूणकर यांच्या पत्नीने केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेलो असता, त्यांनी आमचे ऐकून घेतले नाही. मागील पाच वर्षांत पाच मशीन बोगस निघाल्यात. तेव्हाही सरकारने काहीच केले नाही. निवडणूक आयोगाची कंन्सेप्ट क्लिअर नाही. त्यांच्यात अनेक फॉल्स आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग बंद करून टाका, असे म्हणत राजू येरूणकर यांच्या पत्नीने संताप व्यक्त केला आहे.