महाविकास आघाडीचे आता ‘मिशन EVM’:शरद पवार, उद्धव ठाकरे मैदानात; वकिलांची फौज तयार, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. मात्र आता महाविकास आघाडीच्या वतीने यासाठी ईव्हीएम मशीनला दोष देण्यात येत आहे. ईव्हीएम मशीन मध्ये गडबड करून भारतीय जनता पक्षाने हा विजय मिळवला असल्याचा दावा काही नेते करत आहेत. त्यातच आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील ईव्हीएम विरोधात मिशन उघडण्याच्या तयारीत आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज राज्यभरातील पराभूत उमेदवारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये ईव्हीएम संदर्भातील माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी वकिलाची एक फौज उभी करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. या माध्यमातून कायदेशीर लढाई देखील लढली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पराभूत उमेदवारांनी रोष व्यक्त केल्याची माहिती देखील समोर आली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने देखील राज्यभरातील पराभूत उमेदवारांची एक बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीत देखील ईव्हीएम मशीनच्या आकडेवारी बद्दल आपापल्या मतदारसंघातून अपडेट माहिती गोळा करण्याचे आदेश पराभूत उमेदवारांना देण्यात आले आहे. आगामी काळात ईव्हीएम मशीन विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने राज्यामध्ये जन आंदोलन उभे करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही माहिती महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे. आव्हाड यांच्याकडूनही ईव्हीएमवर प्रश्न ईव्हीएम मशीनच्या गडबडीच्या माध्यमातूनच महाविकास आघाडीचा पराभव झाला असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ईव्हीएम मशीन विरोधात आम्ही आजच नाही तर या आधी पासूनच बोलत असल्याचे जितेंद्र आवड यांनी म्हटले आहे. ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड नक्कीच असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या विरोधात जन आंदोलन उभे करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.