मनसेच्या एकमेव आमदाराचा पराभव:निकाल येतील जातील आपले प्रेम कायम राहील, राजू पाटलांची भावुक प्रतिक्रिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यामुळे मनसेचा एकमेव आमदार देखील आता राहिला नाही, याचा मोठा धक्का राज ठाकरे यांना बसला आहे. या पराभवानंतर राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निकाल येतील जातील, आपले प्रेम, आपले ऋणानुबंध कायम राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे राजू पाटील यांनी एक्सवरील पोस्टमध्ये जनतेला उद्देशून म्हणले की, निकाल येतील जातील, आपले प्रेम, आपले ऋणानुबंध कायम राहतील. गेली 5 वर्ष तुम्ही अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रेम दिले, निवडणुकीचा निकाल अनपेक्षित असला तरी तो स्वीकारायलाच हवा. तुमची ‘राजूदादा’ ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांची ती खरी पोचपावती असते. माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक मतदाराचे आणि माझ्यासाठी अहोरात्र मेहनत केलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. आपला, प्रमोद (राजू) रतन पाटील, असे त्यांनी लिहिले आहे. मनसे पक्षाची स्थापना झाल्यावर 2009 च्या निवडणुकीत 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मनसेचा केवल एकच आमदार निवडून आला होता, ते म्हणजे राजू पाटील. यंदाच्या निवडणुकीत मनसेने 128 उमेदवार रिंगणात उतरवले होते. महायुतीच्या साथीने किमान 5 ते 10 जागा जिंकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, एकही उमेदवार निवडून आले नाही. दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत अनपेक्षित असा निकाल समोर आला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. महायुतीने तब्बल 236 जागा निवडून आणल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्री देखील मनसेच्या पाठिंब्याने होणार असेही राज ठाकरे म्हणाले होते. तसेच माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला आहे.