वृत्तसंस्था, नवी दिल्लीः मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी संघाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इल्यासी यांची भेट घेऊन चर्चा केली. दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत बंद दाराआड तासभर झालेल्या या बैठकीनंतर इल्यासी यांनी ‘हिंदू-मुस्लिमांचा डीएनए एकच आहे’, असे प्रतिपादन केले. भागवत हे राष्ट्रपिता आहेत, असेही ते म्हणाले.

देशातील सामाजिक सौहार्द टिकून ठेवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरसंघचालक भागवत यांनी यापूर्वी मुस्लीम बुद्धिजीवींशी चर्चा केली होती. दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग, माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, अलिगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलपती जमीर उद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी यांचीही भेट घेतली होती. संघाचे सहसंघचालक कृष्ण गोपाल, राम लाल व इंद्रेश कुमार यावेळी उपस्थित होते. या बैठकीतील तपशील इल्यासी यांचे बंधू सुहैब इल्यासी यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर मांडला. इल्यासी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भागवत यांनी हिंदूंचा उल्लेख ‘काफीर’ असा केला जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला. तर मुस्लीम बुद्धिवंतांनी मुस्लिमांची ओळख जिहादी व पाकिस्तानी अशी करून देण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

खरे तर काफीर या शब्दाचा गाभा वेगळाच आहे. परंतु आता त्याला अपशब्द म्हणून ओळख मिळाली आहे, असा दावा मुस्लिमांनी केला. यावेळच्या चर्चेमध्ये भागवत यांनी हिंदू-मुस्लिमांच्या भूतकाळाबद्दल भाष्य केले व एकोपा राखण्याबाबतच्या प्रयत्नांविषयी चर्चा केली. या बैठकीनंतर संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, ‘सरसंघचालक समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधतात. अखंड संवाद प्रक्रियेचाच हा एक भाग आहे.’

‘भागवत म्हणजे राष्ट्रपिता’

‘हिंदू व आमचा डीएनए एकच आहे. केवळ प्रार्थनेची पद्धत वेगळी आहे’, असे सांगतानाच इमाम संघटनेचे प्रमुख इल्यासी यांनी भागवत यांना राष्ट्रपिता असे संबोधले. तर ‘या भेटीमुळे देशात चांगला संदेश पोहोचला आहे. आम्ही कुटुंब सदस्याप्रमाणे चर्चा केली. आमचे आमंत्रण भागवत यांनी स्वीकारले, याचा आम्हाला आनंद आहे’, असे इल्यासी यांचे बंधू सुहैब यांनी नमूद केले.

मुलांनी केला वंदे मातरमचा जयघोष

सरसंघचालकांनी यावेळी येथील एका मदरशासदेखील भेट दिली. मदरशास त्यांनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. यावेळी भागवत यांनी तेथील मुलांशी संवाद साधला. तसेच, त्यांचे कुराणपठणही पाहिले. या मुलांनी यावेळी वंदे मातरम व जय हिंद या नाऱ्यांचा घोष केला, अशी माहिती भागवत यांच्यासोबत असणाऱ्यांनी दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.