कल्पनाच्या वागण्याचा अर्थ कोणालाच लागत नसतो. अर्जुन कल्पनाला म्हणतो की मम्मा तिच्या या वागण्यावर त्याचा अजिबात विश्वास बसत नाहीये. ती अर्जुनला म्हणते की तिने सायलीला आजपर्यंत डोक्यावर चढवलं, आता पुढे ती असं करणार नाही. अर्जुनची सायलीसाठी खूप तळमळ होत असते. सायली खोलीतून आर्त हाक मारत असते, ती कशालाही हात लावणार नाही असं आश्वासन देते. मात्र तरीही कल्पना दार उघडत नाही. पूर्णा आजीलाही कळत नसतं की कल्पना एवढं कठोर का वागली?
विमल कल्पनाला विचारते की तुमचाही जीव यानंतर जळतो आहे, तरी तुम्ही असं का वागताय? अर्जुन जेव्हा सायलीला खोलीतून बाहेर काढायला जातो, तेव्हाही कल्पना त्याला रोखते. त्याने सायलीला बाहेर काढण्याबाबत एक शब्द जरी काढला तरी तो तिचा अपमान असेल, असं कल्पना म्हणते. असं म्हणून तीही स्वत:च्या खोलीत निघून जाते आणि ओक्साबोक्शी रडू लागते. अर्जुनला तिची तळमळ बघवत नाही, म्हणून तो तिच्यामागे खोलीत जातो. अर्जुन मोठ्या प्रेमाचे आईचे अश्रू पुसतो आणि तिची घालमेल समजून घेतो.
कल्पना अर्जुनला म्हणते की, ‘माझ्या आधीची पिढी आणि नंतरची पिढी यांच्यातील सांधा बनायचं आहे मला, पण ते काही केल्या होत नाहीये. पूर्णा आजीचा आदर करायचा आहे आणि सायलीवर माया. या दोन्ही गोष्टी करताना ओढाताण होतेय. म्हणून म्हटलं आज हेही करुन बघूया.’ सायलीसाठी तिला काहीच करता येत नाहीये, याचं कल्पनाला वाईट वाटतं. सायलीही तिच्या खोलीत बसून रडत असते. कृष्णजन्माची पूजा सायलीवाचूनच पार पडते.
पुढील भागाच्या प्रोमोमध्ये सायली पूजेसाठी खाली न येता पूजेत कशी सहभागी झाली आहे ते दाखवण्यात आले. अर्जुन सायलीला व्हिडिओ कॉल करतो आणि तिला पूजेत सहभागी करुन घेतो. यावेळी सायली जन्मकाळानंतर पाळणाही म्हणते.