म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आरे ते कफ परेड या भूमिगत मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा वेळेत सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. ही मार्गिका उभी करणाऱ्या एमएमआरसी कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांनी यासाठी आरे येथील कारशेड व मार्गिका आणि स्थानकांची कसून पाहणी चालवली आहे. यादरम्यान गाड्यांचे गंज काढणारी विशेष गाडीदेखील कारशेडमध्ये दाखल झाली आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर ते दक्षिण जोडण्यासाठी मेट्रो ३ ही भूमिगत मार्गिका उभी होत आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी असा डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्याची घोषणा याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यादृष्टीने ही मार्गिका सरासरी ९३ टक्के पूर्ण आहे. मात्र प्रणालीशी निगडित कामे व आरे येथील कारशेडचे काम अद्यापही ७५ टक्क्यांदरम्यानच पूर्ण झाले आहे. त्यामुळे मार्गिका सुरू करण्यासाठी जेमतेम दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी हाती असल्याने उच्चाधिकाऱ्यांनी त्वरेने पाहणी सुरू केली आहे.

ही मार्गिका मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनककडून (एमएमआरसी) उभी होत आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, संचालक (प्रकल्प) सुबोध गुप्ता व संचालक (प्रणाली) राजीव यांनी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील सांताक्रुझ, सहार रोड व छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानकाची पाहणी केली. सहार स्थानकाजवळ ही मार्गिका एकमेकांना छेदणार आहे. त्या कामाचीदेखील यावेळी पाहणी करण्यात आली. तसेच स्थानकांची उर्वरित कामेदेखील झपाट्याने करण्याची सूचना त्यांनी दिली. ही स्थानके अनुक्रमे ९३, ९३.६ व ९५ टक्के पूर्ण झाली आहेत.

यानंतर या चमूने आरे येथील प्रकल्पाच्या कारशेडलादेखील भेट दिली. या डेपोतील मुख्य इमारत, प्रणालीशी निगडित कामे, रुळांची कामे यांचा आढावा घेण्यात आला. सध्या हा कारशेड ७४.४० टक्के पूर्ण झाला असून तातडीचे कामे पूर्ण करण्याची सूचना यावेळी देण्यात आली.

गाड्यांचे गंज काढणारे इंजिन दाखल

मेट्रोतील गाड्यांचा दुरुस्तीचा आरे कारशेड डेपो, हा मेट्रो ३ मार्गिकेचा अत्याधिक महत्त्वाचा भाग आहे. आंदोलनासह अन्य तांत्रिक कारणाने डेपोला विलंब झाल्याने मार्गिकेलादेखील विलंब झाला आहे. आता मात्र डेपोचे काम जोमाने सुरू आहे. त्यामध्येच मेट्रो गाड्यांना लागणारा गंज काढणारे विशेष इंजिन अलिकडेच डेपोमध्ये दाखल झाले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *