विनाकारण मालेगावची बदनामी करू नये:इथे सुज्ञ नागरिक राहतात, किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर खासदार शोभा बच्छाव यांचा पलटवार
मालेगाव येथे व्होट जिहाद प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. येथील नामको बँकेच्या शाखेतून बेरोजगार तरुणांच्या खात्याद्वारे 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मालेगावमध्ये व्होट जिहाद फंडिंग घोटाला झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच मालेगाव येथे 1500 बंगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखला देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावर आता खासदार शोभा बच्छाव यांनी पलटवार केला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव म्हणाल्या, किरीट सोमय्या यांनी केलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे. मालेगावमध्ये 115 कोटी रुपये आले आणि लगेच काढले गेले, तेव्हा लोकसभा निवडणुका झालेल्या होत्या. हा पैसा कुठून आला याची सीबीआय चौकशी व्हावी. जनतेसमोर सत्य येईल, विनाकारण मालेगावची बदनामी करू नये, असे शोभा बच्छाव म्हणाल्या आहेत. शोभा बच्छाव म्हणाले, मालेगाव येथे रोहिंगे आणि बांगलादेशी नाहीत. मालेगाव येथील मुस्लिम बांधवांचा जन्म येथे झाला आहे. मालेगावात सुज्ञ नागरिक राहतात. बांगलादेशी व रोहिंगे यांना ते स्थान देणार नाहीत. तसे असल्यास प्रशासन चौकशी करून योग्य ती कारवाई करेल, असे बच्छाव यांनी म्हंटले आहे. पुढे बोलताना शोभा बच्छाव म्हणाल्या, भाजपने देशात 400 पारचा नारा दिला होता. मात्र ते 240 वरच थांबले. विनाकारण मालेगावची बदनामी करण्याचे काम सुरू आहे. देशात हिंदू, दलित आणि अल्पसंख्यांक यांना देखील बदनाम केले जात आहे. हे सर्व घटक महाविकास आघाडी आणि धर्मनिरपेक्षतेसोबत राहिले. मालेगावला सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुस्लिम बांधव महाविकास आघाडीसोबत होते. मालेगाव मध्य क्षेत्रात गेल्या चार लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतल्यास भाजपाला 6000 पेक्षा जास्त मतदान मिळाले नाही. मात्र सेक्युलर उमेदवाराला लाखापेक्षा जास्त मतदान मिळाले आहे. मला 1 लाख 98 हजार मतदान हे मालेगावमध्ये मिळाल्याचा मला अभिमान आहे, असे शोभा बच्छाव म्हणाल्या. मालेगावसहित हिंदू मतदार संघामध्ये देखील काँग्रेसच्या मताधिक्यात वाढ झाली आहे. लोकसंख्या वाढली आणि मतदार वाढले, त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे व्होट जिहाद, लँड जिहाद हे भाजपाचे शब्द आहेत, तसे काहीही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.